बाल शाळेत लेखनारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न

दि. २२ नोव्हेंबर २०२५, शनिवार रोजी माझी बाल शाळेतील फुलवाडीचा लेखनारंभ कार्यक्रम सावरकर हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून कोठारी कॉन्व्हेंटच्या माजी मुख्याध्यापिका सौ. अंजली कडलासकर लाभल्या होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. फुलवाडीतील विद्यार्थिनी अनाया कुचर, शाश्वत काठोळे, रमा देशपांडे, संस्कृती मोहोकार आणि अद्विका वासनकर या विद्यार्थ्यांच्या सुरेख गणपती श्लोकाच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

यानंतर लेखनारंभ विधी पुरोहित श्री. किरण सुदामे यांच्या मंगल श्लोकांनी पार पडला. त्याचवेळी पालकांनी आपल्या मुलांचे पाटीपूजन करून पाटीवर अक्षर गिरवून प्रथम अक्षरांची ओळख करून दिली. यावेळी सौ. मंजुषा वाघोडकर यांनी सरस्वती वंदना सादर केली.

प्रमुख पाहुण्या सौ. अंजली कडलासकर यांनी पालकांना मार्गदर्शन करताना, “मुलांना क्वालिटी टाईम देणे अत्यावश्यक आहे,” असे सांगितले. शाळेच्या कार्यकारिणी सदस्या सौ. वैशाली देशपांडे यांनी मुलं हा “टीपकागद” असल्याने मोठ्यांच्या प्रत्येक हालचालीची मुले टिपतात, म्हणून पालकांनी योग्य वर्तन मुलांसमोर ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले.

शाळेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांनी मुलांच्या अक्षरलेखनावर लहानपणापासून लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली. शेवटी फुलवाडीतील पाच विद्यार्थ्यांनी मंचावरील मान्यवरांसह रांगोळीवर ‘ॐ’ चिन्ह रेखाटून कार्यक्रमाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक स्पर्श दिला.

कार्यक्रमाला ब्राह्मण सभा संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा देव, सौ. वैशाली देशपांडे, बाल शिवाजी शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे, पर्यवेक्षिका रागिणी बक्षी, माझी बाल शाळेच्या पर्यवेक्षिका भारती कुलकर्णी, वर्गशिक्षिका तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन फुलवाडीच्या शिक्षिका सौ. कल्याणी सुदामे यांनी केले.