⚡🔌 विद्यार्थी सुरक्षा समिती व अभियंता दिनानिमित्त विद्युत सुरक्षा जनजागृती! 🔌⚡

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेत अभियंता दिन तसेच विद्यार्थी सुरक्षा समितीच्या वतीने विद्युत सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे महत्त्व समजावे, विद्युत उपकरणांचा सुरक्षित वापर करावा आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) येथील श्री. संदीप कायंदे, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर, श्री. उमेश होले, श्री. रणजीत मोहिते व श्री. अघडते यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विद्युत उपकरणांचा सुरक्षित वापर, विद्युत प्रवाहापासून संरक्षण, विद्युत अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी आणि आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
🌱 हरित ऊर्जा – उज्ज्वल भविष्य!
यावेळी हरित विद्युत निर्मितीचे महाराष्ट्रातील वीजनिर्मितीतील योगदान, देशाच्या आर्थिक विकासातील ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व, वीज बचत, ऊर्जेचा योग्य वापर आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
☎️ आपत्कालीन परिस्थितीत महावितरणशी संपर्क साधण्यासाठी 1912 हा हेल्पलाइन क्रमांक विद्यार्थ्यांना सांगण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी “विद्युत सुरक्षा, हरित ऊर्जा आणि वीज बचत” याबाबत शपथ घेतली. सुरक्षिततेचे नियम पाळणे, सतर्क राहणे आणि जबाबदार नागरिक म्हणून वीजेचा वापर करणे, हा संदेश विद्यार्थ्यांनी आत्मसात केला.
या कार्यक्रमास शाळेचे उपाध्यक्ष श्री. नरेंद्र पाठक, सचिव श्री. मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्या सौ. वैजयंती पाठक, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे, पर्यवेक्षिका सौ. रागिणी बक्षी, शिक्षकवृंद तसेच इयत्ता ७ वी ते १० वीचे विद्यार्थी उपस्थित होते.
✨ “सुरक्षित वीज वापरूया… ऊर्जा वाचवूया… हरित भविष्य घडवूया!” 🌱⚡