शालेय बॉक्सिंग स्पर्धेत वेदश्री गोतमारेची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड!
अकोला : ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी माध्यमिक शाळेची इयत्ता 10 वीतील विद्यार्थिनी कु. वेदश्री योगेश गोतमारे हिने बॉक्सिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरावर सुवर्णपदक पटकावले असून, तिची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, अकोला आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या विद्यमाने आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये वेदश्रीने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. सप्टेंबर महिन्यात झालेल्या १७ वर्षांखालील वयोगटातील तालुकास्तरीय आंतरशालेय बॉक्सिंग स्पर्धेत तिने उल्लेखनीय कामगिरी केली. अमरावती विभागीय बॉक्सिंग स्पर्धेतही तिने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. या यशाच्या जोरावर तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
त्यानंतर १३ ते17 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या परभणी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत वेदश्रीने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकाची कमाई केली. या शानदार कामगिरीच्या बळावर तिची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वेदश्रीने जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हे यश संपादन केले. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, सचिव प्रा. मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे, क्रीडाशिक्षक खुशाल डोंगरे
तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी तिचे अभिनंदन केले. आगामी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या.
