विद्यार्थ्यांकडून शिक्षिकांना मिळाला चंद्रग्रहण दर्शनाचा आनंद!
ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळा जठारपेठ अंतर्गत स्थापित आर्यभट्ट खगोल मंडळातर्फे 3 मार्च रोजी खग्रास चंद्रग्रहणाच्या निमित्ताने काल विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नेहमीच शाळेतर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते; मात्र वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या उपक्रमात खगोल मंडळातील विद्यार्थ्यांनी शिक्षिकांसाठी उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यांनी स्वतः टेलिस्कोप हाताळून प्रत्यक्ष चंद्रग्रहण बघण्याचा आनंद शिक्षिकांना दिला. या खगोल मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. नितीन ओक सर आहेत. मागील कार्यशाळेत सरांनी विद्यार्थ्यांना टेलिस्कोप प्रत्यक्ष हाताळण्याचे प्रशिक्षण दिले होते. या वेळेला दूरस्थ पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा वजा प्रात्यक्षिक करून घेतले व विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याला उत्तम प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास तर वाढलाच त्याचबरोबर अवकाश निरीक्षणाबद्दल त्यांच्या मनातील कुतूहल वृद्धिंगत झाले. व चंद्रग्रहणाचा अद्भुत अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. याप्रसंगी शाळेतील शिक्षिका उपस्थित होत्या. त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.
