बाल शिवाजी शाळेत शिक्षक दिन उत्साहात; विद्यार्थ्यांनी सांभाळली शालेय व्यवस्थापनाची धुरा…

“शिक्षकांच्या भूमिकेत गेल्यावरच त्यांच्या कार्याचे खरे महत्त्व कळते”

अकोला : “शिक्षकांच्या कार्याप्रति असणारे समर्पण त्यांच्या भूमिकेत गेल्यानंतरच खऱ्या अर्थाने कळते,” या भावनेतून विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व आदर व्यक्त केला. निमित्त होते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिनाचे!

स्थानिक जठारपेठ येथील ब्राह्मण सभा शिक्षण संचालित बाल शिवाजी शाळेत ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयोजित ‘स्वयंशासन’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शालेय व्यवस्थापन व अध्यापनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत शिक्षकांची भूमिका प्रभावीपणे साकारली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इयत्ता 10 वीचा विद्यार्थी आदिनाथ पुसेगावकर होता. प्रणव नवले याने प्रास्ताविक केले. श्रीविद्या करंडे व गिरिजा गोगटे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याची व शैक्षणिक विचारांची माहिती दिली.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या शिक्षणविषयक प्रेरणादायी विचारांना उजाळा देत स्नेहल भाकरे हिने विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. अध्यक्षीय मनोगतात आदिनाथ पुसेगावकर याने शिक्षकांची भूमिका पार पाडताना आलेले अनुभव, शिक्षकांचे समर्पण आणि त्यांच्या कार्याचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.

या कार्यक्रमाला शाळेचे उपाध्यक्ष मा. नरेंद्र पाठक, सचिव श्री. मोहन गद्रे, सहसचिव श्री. नरेंद्र देशपांडे, कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र तामणे, श्री. राजेंद्र मेंडकी, कार्यकारिणी सदस्या वैजयंती पाठक, सौ. वैशाली देशपांडे, सौ. मोहिनी मोडक, शाळा समिती सदस्य, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे, सर्व शिक्षक-शिक्षिका व कर्मचारीवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पयोष्णी देशमुख हिने केले, तर अर्श शिरभाते याने आभार मानले. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षक दिनानिमित्त संस्थेतर्फे शिक्षकांना पुस्तक रूपी सस्नेह भेट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यानंतर शिक्षकांसाठी आयोजित सहभोजनाचा सर्वांनी आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी एका दिवसासाठी शिक्षकांची भूमिका स्वीकारत शालेय व्यवस्थापनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडल्याने ‘स्वयंशासन’ उपक्रमातून नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि शिक्षकांच्या कार्याप्रती आदरभाव वृद्धिंगत झाला.