बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला
किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी समुपदेशनाचे यशस्वी आयोजन
बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथे रोटरी क्लबच्या वतीने किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळा समिती सदस्या सौ. वैजयंती पाठक, बाल शिवाजी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, कीर्ती चोपडे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना प्रमुख वक्त्या रोटरी क्लबच्या संचालिका मा. डॉ. मनीषा राठी यांनी किशोरवय हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून या काळात शारीरिक, मानसिक व भावनिक बदल घडत असतात, असे सांगितले. या बदलांकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे, आत्मविश्वास वाढविणे, स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे, संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे, तसेच मोबाईलचा मर्यादित वापर करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना चांगले विचार, चांगली संगत, वेळेचे नियोजन, व्यसनांपासून दूर राहणे, पालक व शिक्षकांशी मोकळेपणाने संवाद साधणे आणि स्वतःचे व्यक्तिमत्त्व सर्वांगीण विकसित करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. मनीषा राठी यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले. विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या समुपदेशनासाठी इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थिनी,शिक्षिका अँड इन्क्लेचर संचालिका डॉ. अतीशा राठी, तसेच रोटरी क्लबचे इतर सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती बापट यांनी केले.
