बाल शिवाजी शाळेची ‘प्लास्टिकमुक्त परिसर’ मोहीम; संकलित प्लास्टिक पुनर्चक्रीकरणासाठी सुपूर्द….

दि. १७ ऑक्टोबर २०२६ : ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ येथील इको क्लबच्या वतीने ‘प्लास्टिकमुक्त परिसर’ या उपक्रमांतर्गत प्लास्टिक संकलन मोहीम उत्साहात राबविण्यात आली.

या मोहिमेत विद्यार्थ्यांना आपल्या घरातील तसेच परिसरातील अनावश्यक प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या संकलित करण्याचे आवाहन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची जाणीव ठेवत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक संकलित केले.

संकलित केलेले प्लास्टिक जिव्हाळा प्रतिष्ठान यांच्याकडे पुनर्चक्रीकरणासाठी सुपूर्द करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, पुनर्चक्रीकरणाचे महत्त्व आणि पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याची प्रेरणा मिळाली.

प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे प्लास्टिकमुक्त परिसराच्या दिशेने शाळेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.