📰 बाल शिवाजी शाळेत विद्यार्थ्यांना सीपीआर प्रशिक्षण! ❤️

अकोला : ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ येथे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रसिद्ध भूलतज्ज्ञ, अतिदक्षता सल्लागार तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले डॉ. राजेंद्र बाळकृष्ण सोनोने यांनी सीपीआर (CPR – Cardiopulmonary Resuscitation) या जीवनरक्षक प्रथमोपचार पद्धतीविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे सीपीआर देण्याची पद्धत, त्यातील बारकावे, योग्य तंत्र आणि आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

अचानक एखाद्या व्यक्तीला हृदयक्रिया बंद पडल्यास किंवा ती व्यक्ती प्रतिसाद देत नसल्यास वेळेत योग्य मदत मिळणे किती महत्त्वाचे असते, हे डॉ. सोनोने यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सीपीआर देताना रुग्णाच्या सुरक्षिततेची खात्री करणे, प्रतिसाद व श्वास तपासणे, तातडीने आपत्कालीन वैद्यकीय मदत बोलावणे तसेच छातीवर दाब देण्याचे योग्य तंत्र यांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिकामुळे विद्यार्थ्यांना या जीवनरक्षक प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती मिळाली.

“संकटाच्या क्षणी योग्य ज्ञान आणि प्रसंगावधान एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते,” हा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, मदतीची भावना आणि आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मीना मुरूमकार यांनी केले. यावेळी शाळेच्या पर्यवेक्षिका  किरण मुरूमकार, रागिणी बक्षी, भारती कुळकर्णी, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.

शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता जीवनोपयोगी कौशल्यांची ओळख करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.