कुटुंब प्रबोधनातून सुसंवाद, संस्कार आणि दृढ नात्यांचा संदेश

बाल शिवाजी प्राथमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथे बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी पालकांच्या उत्स्फूर्त सहभागात ‘कुटुंब प्रबोधन’ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच कुटुंबातील सुसंवाद, संस्कार, परस्पर सामंजस्य आणि पालक-पाल्याचे नाते दृढ व्हावे, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी श्री. राजेंद्र उमाळे, सौ. वैशाली फडणीस, श्री. प्रकाशजी सोनगावकर व डॉ. राधा पुरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.

🔹 प्रथम सत्रात श्री. राजेंद्रजी उमाळे यांनी ‘कुटुंब प्रबोधनाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन करताना संवाद, आत्मीयता व विश्वासाचे महत्त्व सांगितले. तसेच कुटुंबातील ‘६ भ’ – भाषा, भूषा, भवन, भजन, भोजन आणि भ्रमण यांची माहिती दिली.

🔹 द्वितीय सत्रात ‘खेलेंगे खेल तो बढेगा मेल’ या संकल्पनेतून पुरुष व महिला पालकांचे स्वतंत्र गट करून खेळ व कृतीयुक्त उपक्रमांद्वारे सौ. वैशाली फडणीस व श्री. प्रकाशजी सोनगावकर यांनी मार्गदर्शन केले.

🔹 तृतीय सत्रात डॉ. राधा पुरी यांनी मातृशक्तीचे, तर श्री. प्रकाशजी सोनगावकर यांनी पितृशक्तीचे महत्त्व स्पष्ट केले.

🔹 समारोप सत्रात शाळेचे सहसचिव श्री. नरेंद्रजी देशपांडे यांनी पालकांशी मनमोकळा संवाद साधला. श्री. पकदूने, श्री. गिऱ्हे, सौ. टेकाडे व सौ. गायकवाड यांनी मनोगते व्यक्त केली. पालकांनी अशा कार्यशाळांचे वारंवार आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमात पालकांना ‘संकल्प पत्र’ देण्यात आले तसेच पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. नरेंद्रजी पाठक, सचिव श्री. मोहनजी गद्रे, सहसचिव श्री. नरेंद्रजी देशपांडे, मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, श्रीमती कीर्ती चोपडे, शाळा समिती सदस्य, शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रेणुका निखिल भाले यांनी केले. पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत प्रभावी, आनंददायी व प्रेरणादायी ठरला.

✨ “सशक्त परिवार – समृद्ध समाज” ✨