बाल शिवाजी माध्यमिक शाळेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात संपन्न…….

ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेत शुक्रवार दिनांक 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. नरेंद्र पाठक, संस्थेचे सचिव मा. मोहन गद्रे तसेच संस्थेच्या कार्यकारीणी सदस्या  सौ. वैजयंती पाठक यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास राष्ट्रगीताने तसेच राज्य गीताने मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. ज्योत्स्ना कानकिरड यांनी जागतिक कामगार दिन, मराठी राजभाषा दिन तसेच महाराष्ट्र दिनाचे महत्त्व विशद केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्या ज्ञानेश्वर अवारे या विद्यार्थिनीने केले. वेद नागेश देशपांडे याने 2024-25 महाराष्ट्रातील विकासाची घोडदौड आपल्या भाषणातून स्पष्ट केली. तसेच स्नेहल भाकरे हिने मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्रातील विविध बोलीभाषांचे महत्त्व सांगितले. ‘बहू असोत सुंदर संपन्न की महा’ हे गीत शाळेतील शिक्षिकांनी सादर केले. डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये  इयत्ता 6 वी तील तन्मय सचिन ताडे व अवनीश मुकेश निचळ तसेच इयत्ता 9 वी मधील राजस्वी नारायण शेगोकार व आदिनाथ श्रीपाद पुसेगावकर यांनी रौप्यपदक पटकावले त्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. इयत्ता 3 री व इयत्ता 6 वी साठी शालेय गणित स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये प्रथम आलेला विद्यार्थी नील अनिल लव्हाळे इयत्ता 3 री व इयत्ता 6 वी मधून गार्गी पराग देशमुख यांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच शाळेने सत्र 2025-26 मध्ये मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ व्हावी या हेतूने सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन केले होते. यामध्ये प्रत्येक गटातून प्रथम क्रमांक काढण्यात आला. वर्ग 3 ते 5 मधून, आरुष उमेश वैद्य आणि 6 ते 8 गटातून, शुभ्रा शरद इधोळ वर्ग 9 वी मधून वेदश्री विशाल बकाल यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. सौ. वैजयंती पाठक यांनी आपल्या मार्गदर्शनातून विविध त्रिसूत्री सांगून विद्यार्थ्यांनी लक्ष विचलित न होऊ देता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा असे मार्गदर्शन केले. या या कार्यक्रमाला माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे, शिक्षक व सर्व कर्मचारी तसेच पालक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम ने ‘करण्यात आली.