वैद्यकीय क्षेत्रात पैशांपेक्षा आत्मिक समाधान महत्त्वाचे…डॉ. विनायकराव देशमुख

दरवर्षी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ब्राह्मण सभा, अकोला ही संस्था समाजातील ज्येष्ठ व सामाजिक उत्तरदायित्व पार पाडणाऱ्या व्यक्तींचा कौतुक सोहळा आयोजित करत असते. यावर्षीही चैत्रप्रतिपदेच्या निमित्ताने संस्थेतर्फे अकोल्यातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ माननीय डॉ. विनायकराव देशमुख यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संस्थेचे सहसचिव श्री. नरेंद्र देशपांडे यांनी केले. त्यानंतर माननीय डॉ. विनायकराव देशमुख यांचे औक्षण करून सन्मान करण्यात आला.

यावेळी ब्राह्मण सभा अकोला संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाशजी देव यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री. नरेंद्र पाठक, सचिव श्री. मोहन गद्रे, सहसचिव श्री. नरेंद्र देशपांडे, कार्यकारिणी सदस्य डॉ. राजेंद्र मेंडकी, डॉ. महेंद्र ताम्हणे आणि श्री. सुधीर मुधोळकर यांनी सन्मानपत्र प्रदान केले. संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या सौ. मोहिनी मोडक यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. आपले मनोगत मांडताना डॉ. विनायक देशमुख यांनी आपल्या जीवनातील ठळक व संस्मरणीय घटनांचा उल्लेख केला. त्यामध्ये आपला मुलगा/मुलगी आजारातून बरे होऊन खेळताना पाहताना पालकांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो पाहण्यातच खरे सुख आहे. त्यांनी त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव सांगितले आणि आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी डॉ. बागडी ह्यांनी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमास ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा देव, सौ. वैजयंती पाठक बाल शिवाजी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, श्रीमती कीर्ती चोपडे व श्री. विनायक देशमुख यांचे कुटुंबीय यांच्यासह सर्व माननीय पदाधिकारी उपस्थित होते.