विदर्भ विज्ञान उत्सवात बाल शिवाजी शाळेचे उज्वल यश….
विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ व संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ विज्ञान उत्सव आयोजित करण्यात आला होता. या उत्सवाअंतर्गत मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन, पोस्टर प्रेझेंटेशन, विज्ञान नाटिका व रांगोळी अशा विविध विभागांमध्ये दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळा, जठारपेठ, अकोला येथील ओम संतोष शेकोकार (इ. 8 वी) व नवल सतीश पाथरे (इ. 9 वी) यांनी संरक्षण या विषयावरील मॉडेल प्रेझेंटेशन मध्ये प्रथम क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्वल केले. तसेच गिरीजा चंद्रशेखर दळवी हिने संरक्षण विषयक रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.या स्पर्धेची पुढील विदर्भस्तरीय फेरी नागपूर येथे 9 व 10 जानेवारी 2026 रोजी पार पडली. या फेरीत बाल शिवाजी शाळेच्या चमूने संरक्षण विषयावरील मॉडेल प्रेझेंटेशनमध्ये तृतीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. रांगोळी स्पर्धेत सहभागी झालेल्या गिरीजा चंद्रशेखर दळवी हिला सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. या यशासाठी विद्यार्थ्यांना राधा कात्रे व सौ. पूर्वा सोमण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव, सचिव श्री. मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी भरभरून कौतुक केले.
