‘दीपध्यान’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना सकारात्मकतेचे मार्गदर्शन

बाल शिवाजी शाळेत लाईफ इन बॅलन्स संकल्पनेतून मार्गदर्शन सत्र संपन्न

जीवनात आनंदी, समाधानी आणि यशस्वी होण्यासाठी ज्ञानासोबतच आरोग्य आणि आर्थिक समृद्धी यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यासाठी आवश्यक असलेली एकाग्रता आणि सकारात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन दैनिक सकाळच्या एलआयबी (Life In Balance) कार्यक्रमाचे राज्यप्रमुख सुधीर सुतार यांनी केले. ते बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथे आयोजित ‘दीपध्यान’ या विशेष मार्गदर्शन उपक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. लाईफ इन बॅलन्स या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना एकाग्रता, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी यांचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमास प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे, तसेच माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, व शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.