मा. आमदार डॉ. रणजित पाटील यांची बाल शिवाजी शाळेला सदिच्छा भेट
स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा २०२१ मध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. सलग २० वर्षांपासून शाळेने १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बोर्डाने घेतलेल्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले. इयत्ता ९ वी चे ५०% गुण व इयत्ता १० वी चे ५० % गुण या निर्धारित केलेल्या गुणदान पद्धतीनुसार निकाल घोषित करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व बाल शिवाजी शाळेचे अभिनंदन करण्यासाठी मा. आमदार डॉ. रणजित पाटील यांनी बाल शिवाजी शाळेला सदिच्छा भेट दिली. शाळेला घवघवीत यश मिळाल्याबद्दल मा. आमदार डॉ. रणजित पाटील यांनी संस्था संचालक, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले. मा. आमदार डॉ. रणजित पाटील यांनी बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. मागील शैक्षणिक वर्षात लॉकडाऊन असून सुद्धा कुठेही विद्यार्थ्यांचे शिक्षण शाळेने बंद ठेवले नाही, विद्यार्थांना शिक्षणापासून वंचित ठेवले नाही. शाळेनी घेतलेल्या अथक परिश्रमाचे हे यश आहे या शब्दानी मा. रणजित पाटील यांनी शाळेला गौरान्वित केले. तसेच शिक्षिकांशी संवाद साधला त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. येणारे शैक्षणिक वर्ष त्याबाबत येणाऱ्या समस्या याबद्दल जाणून घेतले. याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे सर, उपाध्यक्ष श्री. बाबासाहेब पाठक, शाळा समिती सदस्य श्री. नरेंद्र देशपांडे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रकाश चतरकर सर, श्री. नितीन बंडावार सर, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे, सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.