” स्वा . सावरकर हे क्रांतिकारकांचे कुलपुरुष तसेच विज्ञाननिष्ठ हिंदू संघटक होते ”  …… कु. भक्ती देशमुख  

स्वा . सावरकरांचे विविध पैलु  आणि  वर्तमानातील त्यांची प्रासंगिकता  ह्यांचे  चिंतन करतांना  पुण्याच्या युवा व्याख्याता    कु  भक्ती अरविंद देशमुख ह्यांनी स्वा. सावरकर ह्यांचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलु , शतपैलु , सहस्त्रपैलुच नव्हे तर अनादी , अनंत  होते हे स्पष्ट केले .  उत्कृष्ट  देशभक्ती  आणि प्रखर  स्वातंत्र्यनिष्ठा  हा त्यांच्या कालोचित सशस्त्र क्रांतीमागील मूळ उद्देश होता .कु भक्ती  देशमुख ह्यांनी स्वा  सावरकरांच्या   जीवनाचे मुख्यतः तीन कालखंडात   वर्णन करतांना,  लंडन पर्वा मध्ये त्यांच्या युवावस्थेतील धडाडी, अंदमान पर्वामध्ये त्यांनी गाठलेली सहनशक्तीची परिसीमा आणि रत्नागिरी पर्वामध्ये समाज सुधारणे   अंतर्गत जातीभेद   निर्मूलन , साक्षरता क्रांती ,धर्मांतरीतांचे शुद्धीकरण ह्या विषयांवर सोदाहरण  मार्मिक विवेचन केले . स्वा . सावरकरांचे उत्तरार्धातील आयुष्याला  ‘उपेक्षापर्व ‘ म्हणून संबोधित करून कु . देशमुख म्हणाल्या.

“राजकीय आकसापोटी तत्कालिन राज्यकर्त्यांनी गांधीवधासारख्या  खटल्यामध्ये  स्वा . सावरकरांना निष्कारण  गोवले तर टीकाकारांनी त्यांच्या हिंदुत्वाचा  विपर्यास केला. ”   शेवटी स्वा . सावरकरांचे  द्रष्टेपणा  अधोरेखित करतांना “सावरकरवाद ” काळाच्या कसोटीवर प्रासंगिक ठरला आहे हे सांगतांना  वर्तमानातील  परराष्टनिती,  संरक्षणनीती    ह्याविषयी  त्यांनी अनेक दाखले दिलेत . दरवर्षी प्रमाणे  यंदाही  ब्राह्मण सभा अकोलाच्या  वतीने  दि 26 फेब्रुवारी 2023 ला संध्याकाळी ६-०० वाजता  बाल शिवाजी शाळेच्या प्रांगणात स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त्त   व्याख्यानाचे   आयोजन  केले गेले . कु भक्ती देशमुख यांनी ‘अनादी …अनंत ….सावरकर”  या विषयाच्या  अनुषंगाने मार्गदर्शन  केले. व्यासपीठावर ब्राह्मण सभेचे  अध्यक्ष श्री अविनाश देव , सचिव श्री मोहन गद्रे उपस्थित  होते .              

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्यकारी सदस्य श्री नरेंद्र देशपांडे  यांनी केले  तर  अतिथींचा  परिचय शाळेच्या शिक्षिका सौ . सीमा देशपांडे  यांनी करून दिला . कार्यक्रमापूर्वी  स्वा . सावरकर सभागृहात स्वा . सावरकरांच्या  पुतळ्याचे डॉ नानासाहेब चौधरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.  बाल शिवाजी शाळेतील गायन चमूने ह्या प्रसंगी  ‘ जयोस्तुते ….. ‘ हे गीत सादर केले.  कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ . राजेंद्र मेंडकी  यांनी केले .