स्वा.सावरकरांची राजकीय हत्या करणे थांबवा – मा. श्री. शिवरायजी कुळकर्णी
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पणदिननिमित्त ब्राह्मण सभा अकोला तर्फे बाल शिवाजी शाळेच्या प्रांगणात रविवार दिनांक 25. 2. 2024 सायंकाळी ६. ०० वाजता अमरावती येथील प्रसिद्ध व्याख्याते मा. श्री. शिवराज्य कुळकर्णी , भा. ज. पा. महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले. स्वा. विनायक दामोदर सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त ब्राह्मण सभा अकोला तर्फे आयोजित व्याख्यानाचा विषय ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नॅरेटिव वॉर !’ हा होता. कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका सौ. सीमा देशपांडे यांनी केले. बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या चमूने ‘जयस्तुते श्रीमहन्मंगले …. ‘ हे गीत उत्कृष्टपणे सादर केले. मा. शिवराय कुळकर्णी यांचा परिचय मा. श्री राजेंद्र मेंडकी यांनी करून दिला. आपल्या व्याख्यानात माननीय कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वभावातील विविध पैलू प्रभावीपणे स्पष्ट केले. काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना ‘कमला’ या काव्याची निर्मिती कशी झाली, तुरुंगात सावरकरांनी भोगलेल्या प्रचंड हालअपेष्टा सांगितल्या. समाजसुधारक म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले कार्य, पुर्वास्पृश्यांना कीर्तन, भजन शिकवून लोकजागृती करणारे , भेदभाव नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील असणारे सावरकर, इंग्रज अधिकाऱ्यांना कायद्याच्या चौकटीची जाणीव करून देणारे, परखडपणे अन्यायाची दाद मागणारे सावरकर अश्या त्यांच्या या विविध स्वभावविशेष माननीय श्री कुलकर्णी यांनी श्रोत्यांसमोर मांडले. सावरकरांची राजकीय हत्या करणे थांबवा तसेच सावरकरांना ‘माफीवीर’ म्हणणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या असे आवाहन श्री. कुळकर्णी यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमास संस्थेचे कार्यकारिणी सदस्य,शाळेच्या मुख्याध्यापिका, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पालकवर्ग. शिक्षिका, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन संस्थेच्या सहसचिव सौ. वैशाली देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता श्री. महेश जोशी यांनी गायलेल्या वंदे मातरम ने करण्यात आली.