‘ विशेषाकडून ‘ सामान्याकडे रिद्धीचा असामान्य प्रवास.
माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा ! पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास याच टप्प्यावर निर्माण होतो. अशाच दुर्दम्य आत्मविश्वासाचे उदाहरण म्हणजे अकोला येथील जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेच्या इयत्ता १० तील विद्यार्थिनी रिद्धी आशिष कांडलकर. नुकताच इयत्ता १० चा निकाल लागला. रिद्धीने ८५ टक्के गुण या परीक्षेत प्राप्त केले. तिचा हा प्रवास सोपा नव्हता. (कर्णबधीर) विशेष शाळेतून सामान्य शाळेत इयत्ता ५ वी तिने प्रवेश घेतला. आत्मविश्वास व आई वडिलांच्या भक्कम पाठिंबा असल्यामुळेच सहाध्यायींसमवेत कुठेही कमी न पडता तिची यशस्वी वाटचाल सुरू झाली. केवळ अभ्यासच नाही तर शालेय उपक्रम, स्नेहसंमेलन इ. कार्यक्रमातही रिद्धी उत्साहाने सहभागी असायची. तिच्या यशाचे खरे गमक म्हणजे वर्गात शिक्षिकांकडून मिळणाऱ्या सूचनांकडे बारकाईने लक्ष देऊन त्याचे पालन करणे, शाळेने वर्षभराच्या अभ्यासाचे करून दिलेले नियोजन, प्रत्येक विषय शिक्षिकेचे वैयक्तिक मार्गदर्शन, शाळेतील सात्यत्यपूर्ण सराव आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रिद्धीने घेतलेली कठोर मेहनत यामुळेच रिद्धीचा आत्मविश्वास एवढा वाढला कि तिने १० वी बोर्डाच्या परीक्षेत तिला शासन नियमानुसार विशेष विद्यार्थ्यांना मिळणारी अतिरिक्त वेळेची विशेष सवलत देखील तिने नाकारली आणि नियोजित वेळेतच पेपर सोडवले ही बाब खरोखरच अभिनंदनीय आहे. परीक्षा केंद्रावर उपस्थित परीक्षकांनीही तिच्या या निर्णयाचे कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री.विश्वनाथ गद्रे,कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव,ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य, सर्व शाळा समिती सदस्य, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर, प्राथामिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे व शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिने प्राप्त केलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक केले.
रिद्धी चे मनोगत
बालविकास विशेष शाळेतून सामान्य प्रवाहात येण्यासाठी बाल शिवाजी शाळेने माझ्यावर विश्वास दाखवून मला इयत्ता ५ वीत प्रवेश दिला. माझ्या कर्णबधिरत्वाचा स्वीकार करीत प्रत्येक शैक्षणिक टप्प्यावर बारकाईने लक्ष दिल्यामुळेच मी आत्मविश्वासाने पुढील वाटचाल करीत आहे. शाळेतील पोषक वातावरणामुळे मला माझ्या कर्णबधिरत्वावर मात करून स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली. शाळेतील माझ्या मैत्रिणींनी सुद्धा मला समजून घेतले योग्य वेळी मदत केली आणि माझी मदतही मागितली. त्यामुळे शाळेतून विद्यार्थ्यांवर होणाऱ्या सुसंस्कारांची अनुभूती झाली या शाळेतून मिळालेल्या शिक्षणाचा व मार्गदर्शनाचा मला आयुष्यभर फायदा होईल. शाळेत सातत्याने होणाऱ्या सरावामुळे माझ्या मनात पेपर वेळेत सोडवण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला व त्यामुळेच मला मिळणारी वाढीव वेळेची सवलत मी नाकारली. आज मी १० वीच्या परीक्षेत ८५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे. या यशामध्ये बाल शिवाजी शाळेचा मोठा वाटा आहे. याकरिता संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अविनाश देव सर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जळमकर मॅडम, सौ चोपडे मॅडम, तसेच सौ.अग्रवाल मॅडम, वर्गशिक्षिका सौ.कीर्ती खपली मॅडम व सर्व विषय शिक्षिका यांचे मी व माझे पालक सदैव ऋणी राहू.
कु. रिद्धी आशिष कांडलकर