बाल शिवाजी शाळेत स्वातंत्र्य सेनानींची ओळख

स्थानिक जठारपेठ येथील ब्राह्मण सभा शिक्षण संकुलांतर्गत बाल शिवाजी शाळेत अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त  विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे शहरातील स्वातंत्र्य सेनानींच्या स्वातंत्र्य लढ्यातील अमूल्य योगदानाची माहिती तथा त्यांची ओळख सर्वांना होण्यासाठी ७५ स्वातंत्र्य सैनिकांचे रेखाचित्र व माहिती प्रदर्शनी शाळेत या निमीत्ताने आयोजित केली आहे. स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून  ‘ स्वातंत्र्य  सैनिकांच्या जीवन कार्याची ओळख’ हा कार्यक्रम शाळेत संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते जेष्ठ नाट्यकर्मी  श्री. दिलीप देशपांडे, ‘ स्वातंत्र्याच्या मशाली ‘ या पुस्तकाचे  लेखक श्री. धनंजय देशपांडे, ढोणे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. गजानन बोबडे उपस्थित होते. 

श्री. देशपांडे सर यांनी अकोल्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या गोष्टी उत्तम रितीने विद्यार्थ्यांना सांगितल्या. ‘विद्यार्थ्यांनी देशासाठी जगायचंय, समाजातील अंधश्रद्धा व कुपोषण निर्मूलन करण्यास हातभार लावून चांगले नागरिक बनायचंय, इतिहासातील घटनांचा अभ्यास करून स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचे नेहमी स्मरण करावे’ असे आवाहन त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना केले. या  कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, संस्थेच्या सचिव श्री. विश्वनाथ गद्रे , कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव, मा. निलेश देव, प्राथामिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर व शाळेतील सर्व शिक्षिका,  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनिता वानखेडकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने  झाली.