बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थ्यांना ऋषितुल्य श्री. वसंतजी गाडगीळ यांचे उद्बोधन
स्थानिक बाल शिवाजी शाळेत ‘ शारदा ज्ञानपीठ ‘ चे संस्थापक, संस्कृत पत्रिकेचे संपादक माननीय श्री. वसंतजी अनंत गाडगीळ यांनी सदिच्छा भेट दिली. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव यांनी मा. श्री वसंतजी अनंत गाडगीळ यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. तत्पूर्वी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलन व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन केले. मा.श्री.वसंतजी गाडगीळ यांनी सरल, सुबोध संस्कृत भाषेत विद्यार्थ्यांना संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना ‘ वंदे मातरम ‘ या राष्ट्रगीताचा मराठीत भावार्थ सोप्या शब्दात सांगितले. विद्यार्थ्यांना मातृशक्तीचा आदर करण्याचा संदेश त्यांनी याप्रसंगी दिला. अथर्वशीर्षाचे योग्य पठण व उच्चारण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतले.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री विश्वनाथ गद्रे, ब्राह्मण सभा कार्यकारणी सदस्य सौ. अनघाताई देव, श्री नरेंद्र देशपांडे , बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, मा. श्री. ब्रिजेश पंडित, सर्व शिक्षिका, विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सौ स्वाती बापट यांनी केले. कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने झाली.