बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचा लेखन स्पर्धेत उल्लेखनीय यश….

पुणे, प्रतिनिधी : शब्दसारथी इंद्रधनू यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “एक पत्र… कृतज्ञतेचं!” या आगळ्यावेगळ्या लेखन स्पर्धेत ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

“एक पत्र… कृतज्ञतेचं!” या विषयावर आधारित या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक, मित्र तसेच जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींप्रती असलेली कृतज्ञता पत्ररूपाने व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या लेखनातून त्यांच्या संवेदनशीलतेचा आणि विचारांच्या प्रगल्भतेचा प्रत्यय आला.

या स्पर्धेत बाल शिवाजी शाळेचा विद्यार्थी अर्णव रवींद्र भांबेरे याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याने आपल्या लेखनातून मित्राविषयी कृतज्ञतेची भावना अत्यंत प्रभावी आणि हृदयस्पर्शी पद्धतीने मांडली. तसेच आदित्य योगेश आवळे याने द्वितीय क्रमांक मिळवत शिक्षकांविषयी कृतज्ञतेची भावना यावर उत्कृष्ट लेखन कौशल्याचे प्रदर्शन केले. ईरा आशिष बक्षी हिने आई विषयी कृतज्ञतेची भावना  पत्ररूपाने व्यक्त केली त्यामध्ये तिला उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक गुणवत्तेत आणखी भर पडली असून, विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षिका यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. अविनाश देव, उपाध्यक्ष श्री नरेंद्र पाठक. सचिव श्री. मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा देव, व सौ. वैजयंती पाठक, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जळमकर, तसेच बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे, शिक्षकवृंद व कर्मचारीवर्ग यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.