बाल शिवाजी शाळेच्या आजी आजोबा मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद……
ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळा, जठारपेठ येथे आजी-आजोबा मेळावा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास १४७ आजी-आजोबांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. मेळाव्यात आजी-आजोबांसाठी विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले व विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी मा. डॉ. किशोर देशपांडे व सौ. केतकी किशोर देशपांडे हे आजी आजोबा लाभले.
प्रमुख अतिथी मा. डॉ. किशोर देशपांडे यांनी आजी – आजोबांनी नातवंडांशी जुळवून घेत बदलत्या काळाशी समन्वय साधण्याचे मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव यांनी महिला दिनानिमित्त कवितेतून स्त्रीशक्तीचा गौरव केला.
कार्यक्रमास संस्थेच्या पदाधिकारी, मुख्याध्यापिका व शिक्षकवृंद उपस्थित होते. जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित सर्व आजींना भेटवस्तू प्रदान करण्यात आली. शाळेकडून आजी आजोबांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
