बाल शिवाजी माध्यमिक शाळेला मा. डॉ. विश्वास सापटणेकर यांची सदिच्छा भेट
स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी माध्यमिक शाळेत १२ एप्रिल रोजी राष्ट्रीय कीर्तीचे स्कुबा डायवर तसेच उद्यमशील समाजव्रती डॉ श्री. विश्वास सापटणेकर यांनी सदिच्छा भेट दिली. शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना SMART GOAL विषयी सांगितले, आपल्या आयुष्यात नेहमी मोठे ध्येय ठेवा. ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. तुमच्यातील क्षमता ओळखून त्याचा उपयोग तर तुम्ही योग्य वेळी, योग्य ठिकाणी केला तर जगात कुठेही तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही मोठे झालात, उच्चपदस्थ असाल तरी आपले कुटूंब, आपला समाज, आपला देश यांच्याप्रती असलेले ‘आपले कर्तव्य व जबाबदाऱ्या पूर्ण करा. आपल्या ज्ञानाचा व बुद्धीचा उपयोग देशसेवेसाठी करा, असा बहुमोल संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. आषाढी एकादशीसाठी पंढरपुरला जाणाऱ्या वारीत वारकरी भक्तांसाठी वैद्यकीय सेवा देण्याचे त्यांचे कार्य १५ ते २० वर्षांपासून अव्याहतपणे सुरु आहे, त्यांचे विशेष उल्लेखनीय कार्यकर्तृत्व म्हणजे १९९३ साली मुंबई येथील बॉम्ब हल्ल्याच्या वेळी RDX चा अडीच टनाचा प्रचंड साठा त्यांनी अडीच तासात स्कुबा डायविंग मधील आपल्या कौशल्याने हस्तगत केला व पोलीस यंत्रणेला मदत करून पुढे होणारी प्राणहानी टाळली. आपण घेतलेला हा चित्तथरारक अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांना कथन केला. या कार्यात त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सौ. विद्या सापटणेकर यांचा सुद्धा मोलाचा सहभाग होता. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, कार्यकारिणी सदस्या सौ. अनघाताई देव, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्ती चोपडे, शाळेच्या सर्व शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने झाली. कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या शिक्षिका किरण मुरमकर यांनी केले व आभार प्रदर्शन सौ स्वाती बापट त्यांनी केले. |