बाल शिवाजी माध्यमिक शाळेत भारतीय ज्ञान महोत्सव-२०२६ चे उत्साहात आयोजन…..

ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथे अवनी ग्लोबल फाउंडेशन आयोजित भारतीय ज्ञान महोत्सव २०२६ चे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे सचिव मा. प्रा. मोहन गद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी नंद संचालक श्री. प्रदीप मधुसूदन, नंद गणपती संग्रहालयाचे व्यवस्थापक श्री. माधव देशमुख, अवनी ग्लोबल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. अमृता सेनाड व सचिव श्री. कुशल सेनाड हे प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्ज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या सौ. वैजयंती पाठक, सौ. वैशाली देशपांडे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता जळमकर तसेच प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे यांची उपस्थिती लाभली.

भारतीय संस्कृती, परंपरा व ज्ञानपरंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवामुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध झाले असून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय ज्ञानपरंपरेविषयी अभिमान व उत्सुकता निर्माण झाली आहे. महोत्सवांतर्गत आयोजित मार्गदर्शन सत्रात अवनी ग्लोबल फाउंडेशनचे सचिव श्री. कुशल सेनाड यांनी भारतीय संस्कृतीतील ज्ञानपरंपरेचे महत्त्व सविस्तरपणे विशद केले. अनेक शब्दांचा उगम भारतातच असून त्यांचा वापर इतर देशांनी केल्याची वस्तुस्थितीही त्यांनी मांडली. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय ज्ञानपरंपरेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी महोत्सवांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्यांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. महोत्सवांतर्गत इयत्ता 7 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर एकूण सत्तर मॉडेलचे सादरीकरण करून आपली कल्पकता व संशोधनवृत्ती सादर केली. या स्पर्धेचे परीक्षण मयूर सोमटकर, डॉ. नम्रता सुनील वाघमारे, सौ. संजीवनी चिंचोळकर, सुधीर चव्हाण व सौ. अमृता सेनाड यांनी केले. संस्थेचे उपाध्यक्ष श्री नरेंद्र पाठक, उपसचिव श्री नरेंद्र देशपांडे, तसेच केंद्रप्रमुख श्री नितीन बंडावार यांनी प्रदर्शनीला भेट दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय ज्ञानपरंपरेविषयी अभिमान, अभ्यासवृत्ती व संशोधनाची प्रेरणा निर्माण होत असून भारतीय ज्ञान महोत्सव २०२६ शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत उपयुक्त ठरत आहे. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सहायक अध्यापिका मानसी मानकर यांनी आपल्या भाषणातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन डॉ. सौ. ज्योत्स्ना बबनराव कानकिरड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.