जीवनात यशस्वी होण्यासाठी सामर्थ्यवान शरीराबरोबरच आत्मविश्वास, मनोनिग्रह, निर्भयता कायम ठेवा – सौ. वैशाली देशपांडे  

स्थानिक जठारपेठ येथील बाल शिवाजी माध्यमिक शाळेत राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.  याप्रसंगी  प्रमुख अतिथी म्हणून दि प्रोफेशनल कॉम्प्युटर्स,अकोला च्या संचालिका तसेच  संस्थेच्या सहसचिव सौ. वैशाली देशपांडे ह्या लाभल्या होत्या.  व्यासपीठावर  संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव,  संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे हे उपस्थित होते.  कार्यक्रमाचे अध्यक्ष पद वर्ग ९ च्या संस्कृती विनायक पाठक हिने भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून झाली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत भक्ती मेन हिने  तर  कार्यक्रमाची अध्यक्षा  संस्कृती विनायक पाठक   हिचे स्वागत ईश्वरी म्हैसने  हिने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. पौर्णिमा शांडिल्य यांनी केले. सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ यांचे कार्य व कर्तृत्व या विषयी अर्णवी महाशब्दे हिने आपले विचार मांडले. वैष्णवी चिरडे हिने विवेकानंदांचे चरित्र विद्यार्थ्यांना आपल्या इंग्रजी भाषांणाद्वारे सांगितले.  ‘यशाचा मूलमंत्र ‘ ही गोष्ट श्रावणी इंगळे  हिने सादर केली. ‘ स्वामीजींची शिकवण’  सुबोध पाठक ह्याने भाषणातून सांगितली.  सामर्थ्यवान  शरीराबरोबरच  आत्मविश्वास, मनोनिग्रह , निर्भयता  कायम ठेवा तरच आजची भारतीय युवापिढी अधिक सशक्त होईल असे विचार प्रमुख पाहुणे सौ. वैशाली देशपांडे  यांनी याप्रसंगी मांडले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अथर्व काळपांडे ह्याने आणि आभार प्रदर्शन भार्गव महाकालीवार ह्याने केले.     

या कार्यक्रमास संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या सौ.अनघाताई देव,  बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे,  सर्व शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. गार्गी गाडगीळ हिने सादर केलेल्या एकात्मता मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.