७३ वा प्रजासत्ताक दिन सोहळा बाल शिवाजी शाळेत उत्साहात संपन्न.
शासनाच्या निर्बंधांचे योग्य पालन करीत जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत ७३ वा प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. राष्ट्रगीताने उपस्थित सर्वांनी तिरंग्याला मानवंदना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण मुरुमकार यांनी केले. यावेळी संविधान उद्दिशिकेचे वाचन सौ. रश्मी जोशी यांनी केले. त्यानंतर सी. व्ही. रमण बाल वैज्ञानिक परीक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या संस्कृती विनायक पाठक हिला रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच खंडेलवाल शाळेतर्फे आयोजित राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा २०२२ मध्ये राज्यातून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली वर्ग ४ थी ची पियुषा राजेश भोंडे ठरली. तिला शाळेतर्फे सस्नेह भेट देऊन कौतुक करण्यात आले. संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे यांनी संविधानाचे महत्व व काळानुरूप भारताची होणारी प्रगती व त्यासाठी आपण करावयाचे प्रयत्न, तसेच स्वातंत्र्याची प्रत्येकानी ठेवावयाची जाणीव याबाबत आपले विचार याप्रसंगी व्यक्त केले. संस्थेचे सहसचिव मा. सौ. वैशाली देशपांडे यांनी याप्रसंगी शाळेची सातत्यपूर्ण यशस्वी परंपरा कायम राखणाऱ्या शिक्षिकांचे अभिनंदन केले. प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम वर्ग ८ च्या विद्यार्थ्यांनी आभासी पद्धतीने सादर केला. संविधानाची माहिती श्रीहरी राऊत याने इंग्रजी भाषेत सांगितली. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती यांच्याकडून देण्यात येणाऱ्या शौर्य पुरस्काराची माहिती विधी संतोष झामरे व सानिका रमण घोगरे यांनी उत्कृष्टपणे सादर केली. आपल्या देशसेवेने सर्व भारतीयांचे मन जिंकणाऱ्या मेजर जनरल स्व. विपीन रावत यांचे कार्य अवनी किरण देशपांडे हिने विशद केले. विविधतेत एकतेचे दर्शन घडविणारे एकात्मता गीत आर्या दत्तात्रय कराळे, गार्गी विहार गाडगीळ, अर्णवी राहुल महाशब्दे, अर्पिता प्रविण ढोरे यांनी सादर केले. या गीताला सिंथेसायजरवर अथर्व नितिन ढोरे आणि तबल्यावर साईराम प्रविण साखरकर याने साथसंगत केली. वर्ग ८ वी, ९ वी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रातून विविधतेत एकता हुबेहूब साकारली.
या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे, ब्राह्मण सभा सहसचिव सौ. वैशाली देशपांडे, ब्राह्मण सभा सदस्य डॉ. राजेंद्र मेंडकी, शाळा समिती सदस्य सौ. भक्ती बिडवई, श्री. विजय झापे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे, शिक्षक वृंद, पालकवर्ग व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने झाली.