बाल शिवाजी शाळेत आंतरराष्ट्रीय प्लास्टिक मुक्ती दिन उत्साहात साजरा
स्थानिक ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेत ‘स्वच्छ अकोला, सुंदर अकोला’ या उपक्रमांतर्गत ३ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्तदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी मनपा अकोला येथील माननीय हरिश्चंद्र इटकर सर, पर्यावरण अधिकारी माननीय अनिल बडवे सर, तसेच पर्यावरण कार्यकर्ता व समन्वयक माननीय निलेश देव सर यांची उपस्थिती लाभली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका जळमकर टीचर आणि चोपडे टीचर यांचाही सहभाग होता.कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणाम, पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम याविषयी माहिती देण्यात आली. प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचे महत्त्व आणि पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याचे आवाहन प्रमुख पाहुण्यांनी केले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी घरी संकलित केलेले प्लास्टिक वापरून इको ब्रिक्स तयार केल्या. हे इको ब्रिक्स व संकलित प्लास्टिक मान्यवरांच्या हस्ते शाळेकडून सुपूर्द करण्यात आले. बाल शिवाजी शाळा ही समाजाभिमुख उपक्रमांत नेहमीच अग्रेसर असून पर्यावरण जागृतीसाठी विविध उपक्रम राबवते. यामध्ये विद्यार्थ्यांकडून कापडी पिशव्या तयार करणे, स्टीलचे डबे व पाण्याच्या बाटल्या वापरण्याविषयी पालकांना प्रेरित करणे, तसेच प्लास्टिक बंदीवर आधारित पथनाट्य सादर करून जनजागृती करणे यांचा समावेश आहे. शाळेच्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेमाची बीजे रोवली जात आहेत.
