बाल शिवाजी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी राजभाषा दिन साजरा
बाल शिवाजी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर मा.डॉ. श्री.संजय देवडे प्राध्यापक, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यलाय, अकोला व प्रा.सौ. वैजयंती पाठक सदस्य कुतूहल संस्कार केंद्र,अकोला हे उपस्थित होते. डॉ. सी. व्ही. रमण व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मा.डॉ. श्री.संजय देवडे यांचे स्वागत संस्थाध्यक्ष श्री.अविनाश देव व संस्था सचिव श्री. मोहन गद्रे सर यांनी गुलाबपुष्प देऊन केले. या प्रसंगी बोलताना मा.डॉ. श्री.संजय देवडे यांनी ” प्रत्येक विद्यार्थ्यांने ध्येयाचा आराखडा तयार करावा त्यामुळे यशाचा मार्ग नेमका व सोपा होईल असे सांगितले”.
विज्ञान व मराठी साहित्य यांची सांगड घालत अतिशय रोचक माहिती यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच कुतूहल संस्कार केंद्राच्या प्रा. सौ. वैजयंती पाठक यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन कसा वाढवावा याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मराठी राजभाषा दिनानिमित्य सौ. सीमा देशपांडे यांनी वि. वा. शिरवाडकर यांच्या साहित्याची ओळख आपल्या प्रास्ताविकातून मांडली. उदया देशमुख हिने मराठी भाषेचे महत्व आपल्या भाषणातून सांगितले व ओजस जोशी याने कुसुमाग्रज लिखित ‘ मातीचा पुत्र ‘ ही कविता सादर केली व कवितेचा आशय स्पष्ट केला.
तसेच राधिका ठाकरे हिने विज्ञान दिनाचे महत्त्व व विज्ञानाच्या विविध क्षेत्रातील प्रगती याविषयी सांगितले तर मधुरा किडिले हिने स्त्रियांची विज्ञान व तंत्रज्ञानातील उत्कृष्ट कामगिरी याबद्दल सांगितले. Design, Perform & Explain ही आंतरशालेय स्पर्धा २२ फेब्रु. २०२० रोजी वर्ग ८ ते १० साठी आयोजित करण्यात आली होती. बाल शिवाजीच्या शिक्षिका व कुतूहल संस्कार केंद्र यांच्या सक्रिय सहभागाने आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये कोठारी कॉन्व्हेंट च्या प्रथम गट रुपाली बंग, ख़ुशी हेमनानी, रोहन नेफाडे, सुनिल गुप्ता, स्वरा फिरके व व्दितीय गट अनुज गुप्ता, साहिल राठी, देवेश लाहोटी, रश्मी अग्रवाल, ज्ञानेश्वरी वानखडे या दोनही गटांनी प्रथम क्रमांकाचे १०००/ रु. चे पारितोषिक व प्रमाणपत्र पटकावले.
प्रभात किड्स स्कूलच्या आर्क शर्मा, भाविक लढ्ढा, दुर्वा डागा, तनिष्का देशमुख, रुशील बाहेती यांनी व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. प्रभात किड्स च्या ओजस राठी, संस्कृती टोले, भूमी राठोड, विरती वैद्य, आदित्य ढाले यांनी तृतीय क्रमांक मिळवला. या सर्व विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रशस्ती पत्रक प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षण कुतूहल संस्कार केंद्राचे संचालक डॉ. श्री. नितीन ओक व प्रा. मोनिका देशमुख यांनी केले. Interschool Science Toys Competition ही स्पर्धा २२ फेब्रु. २०२० रोजी वर्ग ५ ते ७ साठी आयोजित आली होती. या स्पर्धेमध्ये शहरातील विविध शाळा सहभागी झाल्या होत्या. त्यात प्रभात किड्स स्कूलच्या अद्वैत जोशी, व्यंकटेश घुगे यांना प्रथम, विवेकानंद इंग्लिश स्कूलचे विनय गोपनारायण व नयन कुकडे याना व्दितीय, बाल शिवाजी शाळेची ज्ञानेश्वरी झापे हिला तृतीय तर कोठारी कॉन्व्हेंट चा जय कुटे व प्रभात किड्स स्कूल चे निकुंज बजाज व आलोक दातार यांना उत्तेजनार्थ बक्षिस प्राप्त केले.
या स्पर्धेचे परीक्षण श्री. निखिल पाठक व सौ. पूर्वा सोमण यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षिसे वितरीत करण्यात आली.या कार्यक्रमात राज्यस्तरीय मराठी बाल विज्ञान परिषदेमध्ये सहभागी विद्यार्थी रोहन धर्माधिकारी, गिरीश बाठे, यशराज घाटोळ, ऋत्विज लांडगे, मधुरा किडिले, स्वरांजली कडू तसेच विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेत राज्य स्तरावर निवड असलेली नमस्वी शेगोकार व होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत राज्यस्तरावर निवड प्राप्त संस्कृती पाठक या सर्व विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षिका सौ. सुनीता कोरडे आणि सौ. श्रद्धा रेलकर यांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
तसेच या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले हस्तलिखित ‘देवाशिष’चे प्रमुख अतिथींच्या हस्ते विमोचन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांनी प्रमुख अतिथींना स्मृतीचिन्ह प्रदान केले. संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे सर यांनी सौ. वैजयंती पाठक यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन सौ. अंजली शेटे यांनी केले. या कार्यक्रमाला संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या सौ. अनघाताई देव, ब्राहमण सभा सदस्य, शाळा समिती सदस्य, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे व भारती कुळकर्णी तसेच शिक्षिका,कर्मचारी, तसेच इतर शाळांचे बक्षिसपात्र विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. एकात्मता मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.