महिषासुरमर्दिनी स्तोत्र सामूहिक पठण
दरवर्षीप्रमाणे यंदाही स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे सामूहिक पठण करण्यात आले. भारतीय संस्कृतीत मातृशक्तीला पवित्र स्थान आहे. मातृशक्ती हे भगवंताचे साक्षात स्वरूप असून विविध देवींच्या स्वरूपातून त्याचा अविष्कार झाला आहे. मातृशक्ती ही केवळ ‘स्त्री’ ची शक्ती नसून ती संपूर्ण मानवजातीची, समाजाची, विश्वाची जननी आहे. त्यामुळेच महाकाली, महालक्ष्मी, व महासरस्वती या त्रिगुणात्मक देवीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे व संपूर्ण सृष्टीचे नियमन करणाऱ्या या आदिशक्तीची उपासना करण्याचा प्रघात भारतीय संस्कृतीत आहे.
मोहरूपी महिषासुराचे मर्दन करून सकल जनांना सन्मार्ग दाखवण्याच्या व त्यांना संकटातून मुक्त करणाऱ्या या दुर्गेच्या रुद्ररूपाचे, शौर्याचे व महत्तेचे वर्णन करणारे स्तोत्र म्हणजे महिषासुरमर्दिनी स्तोत्र. ही भारतीय संस्कृती जपत नवरात्रोत्सवा निमित्य शाळेतील ९०० विद्यार्थी व शिक्षिकांनी महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे सामूहिक पठण केले.
या प्रसंगी ब्राह्मण सभा सचिव श्री. मोहन गद्रे सर,मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे, सौ.शोभा अग्रवाल, सौ. भारती कुळकर्णी. सौ. संगीता जळमकर उपस्थित होते.