७२ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव यांनी भूषविले.
सर्वप्रथम माध्यमिक शालांत परीक्षेत शाळेतून प्रथम आलेले विद्यार्थी अमित घाटोळ व यशराज तायडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी स्वा. सावरकर यांनी रचलेले ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’ हे समूह गीत सादर केले.पहिली महिला हुतात्मा क्रांतिकारक प्रितीलता वड्डेदार यांच्या बद्दल ओजस जोशी याने गोष्ट सांगितली. स्वातंत्र्याच्या तळमळीने व धाडसीपणात तसूभरही कमी नसलेल्या थोर क्रांतिकारक स्त्री बीना दास यांच्याबद्दल अनुष्का चतारे हिने माहिती सांगितली तर पांडुरंग महादेव बापट जे पुढे क्रांतिकारक सेनापती बापट म्हणून ओळखले गेले. त्यांच्याविषयी आस्था बैस हिने त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला. मादाम कामा यांच्याबद्दल वेदांती राऊत हिने तिच्या भाषणातून त्यांचे कार्य सांगितले. या नंतर ‘आओ हम सब गाये ‘ हे समूहगीत विद्यार्थ्यांनी सादर केले. या वेळी अमित घाटोळ व यशराज तायडे ह्यानी मनोगत व्यक्त केले.
यानंतर पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ८वी व ५वी च्या गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना , महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा, पुणे राज्यस्तवर निवड झालेल्या ख़ुशी नितीन मोहोड, अमृता राजेश बाहेकर, जान्हवी दिनेश कोळमकर या विद्यार्थ्यांना अविनाश देव व मोहन गद्रे यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. तसेच माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये जिल्ह्यातून मुलांमधून प्रथम आलेले अमित घाटोळ व यशराज तायडे तसेच द्वितीय क्रमांक रुपेश ठाकरे,साक्षी राऊत व तृतीय क्रमांक आकांक्षा इंगोले या सर्व यशवंत विद्यार्थ्यांना दै.हितवाद तर्फे सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले.
देशाच्या ७२व्या स्वातंत्र्यदिनी संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांनी विद्यार्थीदशेत आपली जबाबदारी, कर्तव्ये पार पाडून देशाच्या प्रगतीला हातभार लावण्याचा व मातृभूमीचे ऋण फेडून उतराई होण्याचा प्रयत्न करावा असा संदेश याप्रसंगी दिला.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री.मोहन गद्रे,ब्राह्मण सभा सदस्य,कार्यकारिणी सदस्य,कार्यकारिणी सदस्या सौ.अनघा देव,शाळा समिती सदस्य,मुख्याध्यापिका सौ.शोभा अग्रवाल,सौ.किर्ती चोपडे,सौ.संगिता जळमकर,सौ.भारती कुळकर्णी,सर्व शिक्षिका,पालक,विद्यार्थी, कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी झामरे हिने केले. कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम’ ने झाली.