बालशिवाजी शाळेत आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात संपन्न

शरीर निरोगी व बलसंपन्न असेल तर मनही प्रसन्न राहून कोणत्याही कार्यात व्यक्ती यश मिळवू शकतो म्हणूनच योगशास्त्राबद्दल जागृती व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रसंघटनेने २१जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे . योगशास्त्राचे महत्व व फायदे विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे यासाठी बालशिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ येथे आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन करण्यात आले . या प्रसंगी संस्थेचे सचिव मा.श्री विश्वनाथ गद्रे व योगप्रशिक्षक श्री.अरविंद जोध उपस्थित होते .

योगप्रशिक्षक श्री अरविंद जोध सरांचे स्वागत संस्थेचे सचिव श्री विश्वनाथ गद्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले .विद्यार्थ्यांनी योग साधना कार्यक्रम पत्रिकेनुसार श्लोकाने सुरुवात करून विविध आसने ,ध्यान आणि प्राणायाम करून योगदिनाच्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला .

जागतिक योगदिवसाच्या निमित्ताने नियमित योग व प्राणायाम नियमित करण्याची शपथ घ्या आणि आपल्या देशाला सुदृढ आणि बलशाली बनवा असे मत श्री जोधा सरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले .

तसेच निरोगी व आंनदी जीवनासाठी दररोज किमान पंधरा मिनिटे तरी व्यायामासाठी द्या व स्वतःच्या शारीरिक तसेच मानसिक क्षमता विकसित करा, असा संदेश संस्थेचे सचिव श्री. गद्रे सरांनी आपल्या भाषणातून दिला .

या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शोभा अग्रवाल,सौ.कीर्ती चोपडे,सौ संगीता जळमकर .सौ भारती कुलकर्णी यांच्यासह शाळेतील शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्वाती बापट यांनी केले.