वक्तृत्व स्पर्धेत वल्लरी रेलकरचे उज्ज्वल यश….
पातूर येथील तुळसाबाई कावल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथील विद्यार्थिनी वल्लरी श्रीकांत रेलकर हिने प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सदर स्पर्धेसाठी वल्लरीने “Is AI a Threat to Human Creativity?” (कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी सर्जनशीलतेस धोका आहे का?) या विषयावर प्रभावी, मुद्देसूद व अभ्यासपूर्ण मांडणी केली. तिच्या स्पष्ट उच्चारशैली, विचारांची खोली आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने परीक्षक व उपस्थितांची मने जिंकली. वल्लरी ही बाल शिवाजी माध्यमिक शाळेची इयत्ता १० वीची विद्यार्थिनी आहे. या यशामागे तिची मेहनत, जिद्द आहे. या स्पर्धेसाठी शाळेच्या शिक्षिका सौ. अपेक्षा आवळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव, सचिव श्री. मोहन गद्रे, कार्यकारणी सदस्य सौ. अनघाताई देव व बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे तसेच सर्व शिक्षिका, कर्मचारी यांनी भरभरून कौतुक केले. व तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
