बाल शिवाजी शाळेत पालकांसाठी ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात वाचनाचे महत्त्व कमी होत चालले आहे. परंतु चांगले जीवन जगण्याकरिता वाचन हे अतिशय महत्त्वाचे आहे. या वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याकरिता बाल शिवाजी शाळेत गेल्या 19 वर्षांपासून दरवर्षी ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन केले जाते. 

पुस्तक  हे केवळ शब्दांचे संकलन नसून ते अनुभवाची खाण, गुंफण आणि ज्ञानाचा दीप आहे.

वाचनामुळे मनुष्यात प्रगल्भता येते. विचारांना नवीन दिशा मिळते. भाषाज्ञान समृद्ध होते. संवाद कौशल्य वाढते तसेच आत्मविश्वास बळकट होतो. म्हणून वाचनाची महती प्रत्येकाने ओळखली पाहिजे. भारत सरकारने देखील आपले माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा वाढदिवस हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जावा असे घोषित केले आहे.

प्रत्येक पालकाने वाचावीत अशी विविध विषयांवरील पुस्तके या प्रदर्शनीत पालकांना बघायला व नंतर वाचायला उपलब्ध होणार आहेत. याचा प्रत्येक पालकाने लाभ घ्यावा. तसेच शाळेने पालकांसाठी निबंध स्पर्धा देखील आयोजित केली आहे.

या स्पर्धेला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा स्तुत्य उपक्रम शाळेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव व सौ. अनघा ताई देव यांच्या प्रेरणेने राबविण्यात आला.तसेच उपक्रमाच्या आयोजनात माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जळमकर व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे यांचे सहकार्य लाभले.