बाल शिवाजी माध्यमिक शाळेत वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा
दरवर्षीप्रमाणे वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग ९ वीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाचे आयोजन शाळेत करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वर्ग ९ वी चा विद्यार्थी स्वानंद मोडक याने भूषविले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वर्ग ९ वी च्या आदित्य जोशी याने आपल्या भाषणातून वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांना शालान्त परीक्षेकरिता शुभेच्छा दिल्या. वर्ग १० वी च्या गीत परळीकर व सायली इंगळे यांनी स्वरचित कवितेतून शाळेप्रती कृतज्ञ भावना व्यक्त केली. गार्गी गाडगीळ, राघवेंद्र देशमुख, संस्कृती पाठक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांनी विद्यार्थ्यांना शब्दरूपी आशीर्वाद दिले. माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर यांनी विद्यार्थ्यांना ‘जिद्द व चिकाटी ठेवून चांगले नागरिक बना ‘ अशा आशीर्वादपर शुभेच्छा दिल्या तसेच वर्ग शिक्षिका पौर्णिमा जोशी यांनी विद्यार्थ्यांना शुभाशिष देत मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री.मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे तसेच सर्व शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना शुभाशिष दिले. वर्ग १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट म्हणून देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मैत्रेयी डांबलकर हिने केले. कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने केली. सर्वांनी अल्पोपाहाराचा आस्वाद घेतला.