स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकते?

महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे आयोजित “स्वच्छ संकल्पसे स्वच्छ सिद्धी” या अभियाना अंतर्गत,जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धेत (अठरा वर्षाखालील गट) प्रथम क्रमांकाचे (रु. १५,०००/-) पारितोषिक प्राप्त निबंध.
“स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकते!”
कु सिद्धी अनंत झामरे
इ.सहावी, बाल शिवाजी शाळा

कु. सिद्धी अनंता झामरे

निबंध स्पर्धेसाठी ‘स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकते?हा विषयच मला अगदी लाजिरवाणा वाटतो. ह्या विषयातच आपण आपल्या देशाप्रती किती कमी पडलो,किती कर्तव्यहीन झालो हे समजते,नाहीतर विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धेसाठी हा विषय देण्याची गरजच पडलीं नसती;कारण जगात महासत्ता होऊ पाहणाऱ्या आपल्या संस्कृतीप्रधान,मूल्यवर्धित देशात आज स्वच्छतेचे धडे अभ्रासक्रमातून द्यावे लागत आहेत. चढाओढीतूनतरी लोक स्वच्छता करतील म्हणून स्वच्छतेसंबंधी विविध स्पर्धा घेतल्या जात आहेत आणि हो!विशेष म्हणजे आपल्याच देशाची,आपल्याच गावाची,आपल्याच घराची स्वच्छता करून रोख रकमेची बक्षिसेही दिली जात आहेत ह्या सर्व गोष्टींचा अर्थ एकच की भारताला भौतिकरित्या स्वच्छ केल्यापेक्षा प्रथम मानसिकरित्या स्वच्छ केले पाहिजे. म्हणजेच कुणाला स्वच्छ भारतासाठी तुम्ही काय कराल हे सांगावेच लागणार नाही पण याला खूप वेळ लागेल म्हणून आजच्या परिस्थितीत मी काय करू शकेन याचाच मी प्रथम विचार करेन.

मी माझ्या भारत देशाच्या स्वच्छतेसंबंधी सर्वात प्रथम माझे मन स्वच्छ करेन कारण माझे मन जर स्वच्छ नसेल तर दुषित मन कधीच काहीच चांगला विचार करू शकणार नाही.माझ्या घरापासूनच मी स्वच्छतेच्या सवयीचा अंगीकार कारेन. त्यासाठी मी पारंपारिक गोष्टींना फाटा देणे समाज बदलावण्याच्या खारीचा वाटा सिद्ध करण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी मी पुढील घटकांना महत्त्व देऊन तसे इतरांना समजावण्याचा प्रयत्न करेन.

माझ्या घरातील स्वच्छता करताना कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून तो कचरा ओला व सुका अशा वेगवेगळा बॅगमध्ये भरून कचरा घंटागाडीतच टाकेन तसेच जो कचरा प्राण्यांना खाण्यायोग्य असेल उदा. भाजीपाला,साली,टरफले तो प्राण्यांना खाऊ घालेन म्हणजे त्यांच्याही चाऱ्याचे नियोजन होईल,तसेच घरातील इतर कचरा उदा. निर्माल्य व झाडांचा पालापाचोळा हा एका जुन्या माठात जमा करून त्याचे खत तयार करून माझ्याच घरातील फुलझाडांना टाकेन घरातील पारंपारिक उत्सवात आईला थोडा बदल करावयास सांगेन की ज्यामुळे भरपूर कचरा निर्माण होतो.ही तर झाली घरची बाब,परंतू सार्वजनिक ठिकाणी सर्व लोक आपलेच ऐकतील असे होणार नाही त्यासाठी मी इतरांना उपदेश देण्यापेक्षा स्वतःच काही काम गांधीगिरी पद्धतीचा अवलंब करेन ज्यामुळे वादही टाळता येतील आणि लोकांचे मत परिवर्तनही होईल.

आजच्या परिस्थितीत आपणास सर्वात जास्त धोका असणारा कचरा म्हणजे ‘ई-कचरा’ की ज्याचे विघटनही होत नाही तो कुठेही वापरता येत नाही किंवाकुजूनही जात नाही यासाठी आपण सर्वांचा एकच प्रयत्न राहील नव्हे माझा तरी हा प्रयत्न राहील की मी ई साहित्याची जास्त खरेदी करणार नाही. ज्यावेळी अति आवश्यकता असेल तेव्हाच नवीन ई वस्तू घेईन तसेच कागदाचा वापर कमीत कमी करून वृक्ष संवर्धन करेन. प्लास्टिक बॅगचा तर वापर मी पूर्णपणे बंदच करेन त्याऐवजी कापडी पिशवी वापरण्याचं हट्ट धरेन. वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न करेन ज्यामुळे कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण होईल.

कारखाने,नदी,समुद्र,डंपिंग ग्राउंड ही सर्व कामे माझ्या हातात नाहीत त्यांना मी एकटी स्वच्छही करू शकत नाही. पण संपूर्ण भारताच्या स्वच्छतेसाठी माझ्यापासून सुरुवात तर करू शकते कारण

“जेथे स्वच्छतेचा ध्यास तेथेच लक्ष्मीचा वास ”

इतरांसाठी नाही पण कमीत कमी आपल्या भरभराटीसाठी तुम्ही मला साथ दयाल का?