सामूहिक अथर्वशीर्षाचे पंचसहस्रावर्तन संपन्न
पवित्र व प्रसन्न वातावरण निर्माण करणारे सामूहिक अथर्वशीर्षाचे पंचसहस्रावर्तनसंपन्न …..
‘त्वमेव केवलं कर्तासि ‘ असे म्हणत अहंकाराची ज्योत विझविणाऱ्या मन व बुद्धीला शांत ठेवणाऱ्या अथर्वशीर्षाचे पठण चैतन्यमय, भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. गणेश उत्सवाचे औचित्य साधून ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी शाळेत मनाला प्रसन्न करणारे अथर्वशीर्षाचे पंचसहस्रावर्तनकरण्यात आले. सर्वप्रथम संस्थेचे सचिव मा.श्री. गद्रे सर, शाळा समिती सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी गणेश पूजन केले. सर्व विद्या व कलांचे अधिष्ठान असलेल्या श्री गणेशाने हिंदू संस्कृती व्यापून टाकली आहे. लहानापासून थोरांपर्यंत सर्वांची आराध्य दैवत असलेल्या या गणेशाचे संत महात्म्यांनी स्तवन केले आहे. अशा या सर्वव्यापी गणेशाला मनोभावे वंदन करून सुबुद्धी, विवेक व सुयशाचे मागणे मागून अथर्वशीर्षाच्या पंचसहस्रावर्तनाला सुरुवात केली. तत्पूर्वी सौ. सीमा देशपांडे यांनी गणपती अथर्वशीर्ष व त्याच्या आवर्तनाचे होणारे फायदे याबाबत माहिती दिली. आवर्तनाच्या उद्घोषाने संपूर्ण परिसर पवित्र व प्रसन्न झाला. अथर्वशीर्षाच्या पठणानंतर श्री. गणेशाची आरती करण्यात आली व प्रसाद वाटप करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया ‘ या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला. याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. श्री. मोहन गद्रे सर , शाळा समिती सदस्य सौ. रेणुका भाले, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे तसेच , शिक्षक वृंद व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण केले.