विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर केवळ ज्ञानार्जनासाठी करावा – श्री. अविनाश देव
जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत ७५ वा प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रगीताने उपस्थित सर्वांनी तिरंग्याला मानवंदना दिली. यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन सौ.अंजली शेटे यांनी केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘आम्हा देशाचा अभिमान ‘ हे समूहगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. मीना काळे यांनी केले. वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले. संविधानाचे महत्त्व रागिणी मानकर हिने आपल्या भाषणातून मांडले. पॅरा नेमबाज शीतल देवी हिची यशोगाथा श्रेयस पाठक याने आपल्या भाषणातून मांडली.’India’s development ‘ हे इंग्रजी भाषण सानिध्या आवारे हिने सादर केले. वर्ग ८ वी च्या विद्यार्थ्यांनी ‘भारत सबसे ऊंचा रहेगा’ हे समूहगीत सादर केले.
याप्रसंगी विविध स्पर्धा परीक्षा व क्रिडा स्पर्धांमध्ये राज्यस्तरीय यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व पदके देऊन कौतुक करण्यात आले. या बक्षिस वितरणाचे संचालन सौ. किर्ती खपली यांनी केले. विद्यार्थ्यांनी मोबाईलला आपल्या यशात अडसर ठरू न देता पूरक करावे म्हणजेच मोबाईलचा वापर केवळ ज्ञानार्जनासाठी करावाअसे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव यांनी केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे, ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य सौ. वैजयंती पाठक, शाळा समिती सदस्य श्री. महेश कोतेगावकर, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे, शिक्षक वृंद, विद्यार्थी, पालकवर्ग व कर्मचारी उपस्थित होते. या बहारदार कार्यक्रमाचे संचालन सुप्रिया देशमुख हिने केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने झाली.