विदर्भ विज्ञान उत्सवात बाल शिवाजी शाळेचे उज्ज्वल यश…
विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ, संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व महाराष्ट्र माध्यमिक शाळा, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० डिसेंबर रोजी विदर्भ विज्ञान उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात मॉडेल मेकिंग स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन, विज्ञान नाटिका व रांगोळी अशा विविध विभागांमध्ये संरक्षण, वनहेल्थ व वातावरण बदल या विषयांवर स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेत ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. शाळेच्या इयत्ता दहावीतील गिरीजा दळवी हिने संरक्षण या विषयावरील रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच संरक्षण या विषयावर इयत्ता आठवीतील ओम संतोष शेगोकार व इयत्ता नववीतील नवल सतीश पाथरे यांनी मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांनी स्वयंचलित पाणबुडी (Automated Submarine) हे अभिनव मॉडेल सादर केले.
या विद्यार्थ्यांना राधा कात्रे व सौ. पूर्वा सोमण या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली, तर इतर सहभागी विद्यार्थ्यांनाही सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली.
या स्पर्धेची विदर्भस्तरीय पुढील फेरी ९ व १० जानेवारी २०२६ रोजी नागपूर येथे होणार आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेचे संचालक श्री. अविनाश देव, मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर व कीर्ती चोपडे यांनी अभिनंदन व कौतुक केले.
