विज्ञान व जीवन यांची सांगड घालून विज्ञान विषय आत्मसात करा – मा. डॉ. सुचेता पाटेकर
‘ विज्ञान व जीवन यांची सांगड घालून विज्ञान विषयाचे ज्ञान प्राप्त करावे ‘ असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मा. डॉ. सुचेता पाटेकर यांनी स्थानिक बाल शिवाजी शाळेत २० डिसेंबर रोजी शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या आयोजन प्रसंगी केले. प्रदर्शनीतील विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रतिकृतींचे त्यांनी अवलोकन करून कौतुक केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मा. डॉ. सुचेता पाटेकर या लाभल्या . तसेच विज्ञान पर्यवेक्षक मा. श्री. प्रमोद टेकाडे सर आणि राज्य विज्ञान समन्वयक मा. डॉ. रविन्द्र भास्कर सर यांनी प्रदर्शनीला भेट दिली. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, मुलांनी स्वतः संशोधन करावे, विचारांना चालना मिळावी, विविध विज्ञान घटकांबाबत त्यांची जिज्ञासा वाढावी या उद्देशाने या विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.
बाल शिवाजी शाळेतील प्राथमिक विभागातून एकूण ८४ विज्ञान प्रतिकृती सादर करण्यात आल्या तर माध्यमिक विभागातून एकूण ३२ विज्ञान व गणित प्रतिकृती विद्यार्थ्यांनी सादर केल्या. त्याचप्रमाणे आरोग्य, पर्यावरण, तंत्रज्ञान, प्रयोग व विविध उपकरणे यांचाही प्रदर्शनीमध्ये समावेश होता. श्री. प्रमोदजी टेकाडे यांनी विद्यार्थ्यांना अशा छोट्या छोट्या प्रदर्शनीतूनच कृतिशील शिक्षण घेता येते असा संदेश या प्रसंगी विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांशी बोलताना डॉ. रविंद्र भास्कर सर यांनी ‘ यासारख्या उपक्रमातूनच पुढील शिक्षणासाठी चालना मिळते ‘ असे सांगितले. या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव मा.श्री. मोहन गद्रे सर, ब्राह्मण सभा सदस्य मा. श्री. नरेंद्र देशपांडे , शाळा समिती सदस्य डॉ .जयंत म्हैसने,श्री नरेन निखाडे, सौ. रेणुका भाले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचा आनंद व्दिगुणित केला. शाळेतील उपस्थित विद्यार्थी व शिक्षिकांनी प्रदर्शनाला भेट दिली.