‘भगिरथ प्रयत्न करून संस्कृत गंगा घरा घरापर्यंत पोहचवा ‘ ….. डॉ. राजेंद्र मेंडकी

ब्राह्मण सभांतर्गत बाल शिवाजी शाळेत संस्कृत दिन व रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. राजेंद्र मेंडकी लाभले होते. तसेच संस्थेचे सचिव मा.श्री.मोहन गद्रे,शाळा समिती सदस्य,मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका,शिक्षकवृंद,पालकवृंद,विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन अनिकेत पाटखेडकर याने केले. सरस्वती पूजन व दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अतिथींचे स्वागत बाल शिवाजी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शोभा अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका सौ.अपर्णा बोराखडे यांनी केले. वर्ग ८ वी च्या विद्यार्थ्यांनी समूहगीतातून संस्कृत संवर्धनाचा संदेश दिला.

मानसी डाबरे हिने ‘कालिदासाची साहित्यसंपदा ‘ आपल्या भाषणातून मांडली. तर रक्षाबंधनाचे महत्त्व रुचा देशपांडे हिने आपल्या भाषणातून सांगितले. प्लॅस्टिक बंदीचा संदेश देणारी नाटिका वर्ग ८ वी च्या विदयार्थ्यांनी सादर केली. संस्कृत दिना निमित्त श्लोक पाठांतर स्पर्धा घेण्यात आली त्या स्पर्धेची पारितोषिके प्रमुख अतिथींच्या हस्ते या कार्यक्रमात देण्यात आली.

‘अ’ गटातून प्रथम क्रमांक पियुषा राजेश भोंडे, द्वितीय क्रमांक प्रणव सतीश नवले व तृतीय क्रमांक आस्था श्रीकृष्ण धाये. ‘ब’गटातून अनुक्रमे वेदांती गिरीश कुलकर्णी,श्रेया अनंत मसने ,वेदश्री दत्तात्रय जोशी यांना पारितोषिक देण्यात आलीत. वर्ग ५ ते ७ साठी घेण्यात आलेल्या स्वलेखन स्पर्धेत वेदांती राऊत प्रथम, भक्ती मेन द्वितीय,आर्या कराळे तृतीय या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे सचिव श्री. विश्वनाथ गद्रे यांनी संस्कृत भाषेची थोरवी तसेच संस्कृत भाषेतील समृध्द शब्द संपत्तीबद्दल माहिती सांगून आपल्या संस्कृत भाषेचा आदर करा असे भाषणातून सांगितले. प्रमुख अतिथीं श्री.राजेंद्र मेंडकी यांनी संस्कृत भाषेमुळे पाठांतर क्षमता वाढते, एखाद्या गोष्टीचा सर्व बाजूने विचार करण्याची वृत्ती वाढते आणि वाणी शुद्ध होते या शब्दात संस्कृतचे महत्व विशद केले.

संस्कृत मुळे ‘वसुधैव कुटुम्बकम’ ही वृत्ती वाढते म्हणून ‘भगिरथ प्रयत्न करून संस्कृत गंगा घरा घरापर्यंत पोहचवा’ असा संदेश संस्कृत दिनाच्या निमित्ताने दिला. आभार प्रदर्शन वैशाली नानोटी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने करण्यात आली.