बाल शिवाजी शाळेत ‘राजभाषा मराठी दिन’ व ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ उत्साहात साजरा
स्थानिक जठारपेठ स्थित ब्राह्मण सभा अकोला संचालित बाल शिवाजी माध्यमिक शाळेत दि.२७ फेब्रुवारी रोजी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध कवी श्री प्रशांत असनारे,श्री सुहास उदापूरकर सर,कुतूहल संस्कार केंद्राचे डॉ.नितीन ओक सर, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अविनाश देव, सचिव प्रा.मोहन गद्रे सर उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली.
‘एकाग्रता वाढवण्यासाठी सतत कृती करत राहणे आवश्यक आहे तर विज्ञान शिकतांना शिकवतांना ९०% प्रात्यक्षिक करण्यावर भर देणे आवश्यक “असे मत विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना श्री सुहास उदापूरकर यांनी व्यक्त केले,तर मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘मान सन्मान व ज्ञान मिळवण्यासाठी वाचन करणे आवश्यक ‘ असे श्री प्रशांत असनारे यांनी आपले मत मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ अर्चना पावडे यांनी केले. कु मानसी राऊत हिने कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी मराठी राजभाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यानी तयार केलेल्या ‘देवाशिष’ या हस्तलिखिताचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यांत आले विध्यार्थ्यासाठी आयोजित स्वरचित कविता लेखन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कविता म्हणून संजीवनी धांडे हिच्या ‘निसर्गराजा’ या कवितेने प्रथम पारितोषिक पटकावले.विशेष उल्लेखनीय म्हणजे व्यास क्रिएशन मुंबई, द्वारे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत शाळेची विदयार्थीनी कु.साक्षी विशाल धारूळकर हिने सहभाग घेतला होता. तिच्या ‘श्यामची आई व आजच्या श्यामची भूमिका’ या निबंधास प्रथम क्रमांक मिळाला आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने डॉ सी व्ही रमण यांच्या ‘रमण इफेक्ट’ चे महत्व या वेळी साक्षी सोळंके हिने सांगितले तर विज्ञान तंत्रज्ञानाच्या विविध माध्यमांचे फायदे व तोटे कु आस्था अग्रवाल हिने विशद केले . कुतूहल संस्कार केद्र अकोला व ब्राह्मण सभा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “Do it yourself “ या उपक्रमातील विजेते स्पर्धक प्रथम शर्मा, आदित्य तिवारी कोठारी कॉन्व्हेंट , मंथन पवार व साहिल कंडारकर स्कूल ऑफ स्कॉलर्स द्वितीय, ऋतिका तापडिया व अनुराग शेळके प्रभात किड्स स्कूल तृतीय या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.
आंतरशालेय विज्ञान खेळणी स्पर्धेतील श्रेया गोसावी व सना चौधरी प्रभात किड्स प्रथम, ध्रुव सारडा व दक्ष सावके प्रभात किड्स द्वितीय, तर अथर्व नालट विवेकानंद स्कूल तृतीय,ओम सोनोने बाल शिवाजी शाळा याला उत्तेजनार्थ पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले, विज्ञान खेळणी या उपक्रमाला प्रा. दत्तराज विद्यासागर व डॉ. सौ मोनिका देशमुख यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
या प्रसंगी आपले विचार व्यक्त करतांना डॉ नितीन ओक सर यांनी विज्ञान शिकणे,समजणे व प्रत्यक्ष आयुष्यात आणणे या भिन्न गोष्टी आहेत. त्यासाठी प्रत्यक्ष कृती व ज्ञानाची सांगड घालावीच लागते असे सांगितले.संस्थेचे अध्यक्ष श्री अविनाश देव यांनी wikipedia वर मराठी लेखन करा असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ अर्चना पावडे यांनी केले. कार्यक्रमाला विविध शाळांमधील शिक्षक व पालक उपस्थित होते.