बाल शिवाजी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न
योग ही भारताची प्राचीन व वैभवशाली परंपरा आहे. योगशास्त्राचे महत्त्व संपूर्ण जगाने ओळखले असून आरोग्यासाठी योगाचे महत्व लक्षात घेता संयुक्त राष्ट्र संघटनेने २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केला आहे. शाळेत सातत्याने विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण देऊन दरवर्षी हा दिवस साजरा केल्या जातो. योगा नियमित केल्यामुळे मन व शरिराकरिता कोणकोणते फायदे आहेत ते योगासने केल्यानंतरच समजू शकते. योगदिनाचे महत्त्व लक्षात घेऊन स्थानिक जठारपेठ परिसरातील ब्राहमण सभा संकुलांतर्गत बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या विविध आसने, ओंकार करून
आंतरराष्ट्रीय योगदिनास आपला सक्रिय सहभाग दिला. विद्यार्थ्यांसाठी आयोजित या उपक्रमास योगप्रशिक्षक मा. श्री. अरविंद जोध यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. शाळेची विद्यार्थिनी कांचन राजेश कवडे हिने आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मार्गदर्शनात श्री. जोध सर यांनी ‘मनाची एकाग्रता ताण तणावाचे नियोजन व सुदृढ शरीर संपदेसाठी योगाभ्यास महत्वाचा आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी योगाभ्यासात सातत्य ठेवावे’ असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या मा. सौ. वैजयंती पाठक यांनी देखील
योगाभ्यासाचे महत्त्व विशद करून पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे, बाल शिवाजी माध्यमिक मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर व शाळेतील शिक्षिकांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे संचालन कु. अनुश्री मांडेकर व प्रास्ताविक शाळेतील शिक्षिका सौ. अंजली महाजन तर अतिथींचा परिचय सौ. किर्ती खपली यांनी केले. एकात्मता मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.