बाल शिवाजी शाळेच्या आजी आजोबा मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
बाल शिवाजी शाळेच्या प्रांगणात आजी आजोबा मेळावा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री. श्रीकांत पडगिलवार व सौ.गौरी पडगिलवार हे आजी आजोबा लाभले. सरस्वती पुजन व दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आदिनाथ सारंग सोमण याने मयुरेश्वर स्तोत्र सादर केले. तर वरदा विक्रांत कुळकर्णी हिने गणेश अष्टोत्तरशतनाम स्तोत्र सादर केले. मेळाव्यात सर्वप्रथम आजी आजोबांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्मरणशक्ती स्पर्धेत आजी सौ. सुनंदा जवंजाळ आणि श्री. रामेश्वर पुंडकर या आजोबांनी बक्षिस मिळवले. तसेच मणी ओवणे या स्पर्धेत श्रीमती अनुसया गावंडे यांनी क्रमांक मिळवला. मनोरा रचणे या स्पर्धेत श्री. विनायक कुकडे यांनी क्रमांक मिळवला. मनोरा रचणे या सहजोडी स्पर्धेत श्री. श्रीकृष्ण वसतकार व सौ. शांताबाई वसतकार या जोडीने क्रमांक पटकावला. संगीत खूर्ची या स्पर्धेत श्री. सुधाकर गाडगे व सौ. ज्योती कुकडे या आजी आजोबांना बक्षिसे मिळाली. सर्व विजयी स्पर्धकांना प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. यानंतर प्रश्नावलीचे उत्तम लेखन करण्याऱ्या श्री व सौ. सुरेन्द्र मानकर आणि श्रीमती कुसुम ताथोड यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. श्री. गाडेकर आजोबा व श्रीमती कुसुम ताथोड आजी यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्री. पडगिलवार यांनी आजी आजोबा मेळावा हा एक विशेष व स्तुत्य उपक्रम आहे. गेल्या १५ वर्षांपासून शाळा हा उपक्रम राबवत आहे. ‘अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांचा विकास करण्यासाठी शाळा नेहमी प्रयत्नशिल असते.’ असे मत व्यक्त केले.
या मेळाव्यास संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे, संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य सौ.अनघाताई देव, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, शिक्षक वृंद, कर्मचारी, मोठ्या संख्येने आजी- आजोबा उपस्थित होते. कार्यक्रमानंतर आजी- आजोबांना अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माझी बाल शाळेच्या प्रमुख सौ. भारती कुळकर्णी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अंजली देशमुख यांनी केले.सौ. शितल टिकले यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.