बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी राबवला  प्लॅस्टिक  निर्मूलनाचा उत्कृष्ट उपक्रम

स्थानिक जठारपेठ परिसरातील ब्राहमण सभा संकुलांतर्गत बाल शिवाजी शाळा  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायम प्रयत्नशील असते तसेच नेहमीच विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी  राबवत असते. याच अनुषंगाने  प्लॅस्टिक  निर्मूलनाचे  महत्त्व लक्षात घेऊन  बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असा उपक्रम राबवला. वर्ग ८ वीच्या विद्यार्थ्यांनी केलेला ‘ प्लॅस्टिकमुक्त परिसर’ या संकल्पनेवर आधारित, पर्यावरणात घातक असलेल्या प्लॅस्टिक ला परिसरातून हद्दपार करण्यासाठी अतिशय स्तुत्य असा उपक्रम  वर्ग शिक्षिका सौ. रश्मी जोशी, सौ. किरण झटाले व सौ. अपेक्षा आवळे यांच्या सहकार्याने केला. विद्यार्थ्यांनी घरातील कापडांच्या प्रत्येकी ५ ते १० पिशव्या याप्रमाणे तब्बल ५०० कापडी पिशव्या शिवून आणल्या. विद्यार्थ्यांनी शाळेतील मा. अध्यक्षांपासून ते सेवक वर्गांपर्यंत प्रत्येकास कापडी पिशवी दिली व प्लॅस्टिक बॅग ऐवजी ती वापरण्यास आग्रहाची विनंती केली. विनम्र शब्दात आपले मत सर्वांपर्यंत पोहोचविले. याबरोबरच विद्यार्थ्यांना घ्यायला आलेल्या पालकांनाही पिशवी देऊन आपल्या उपक्रमाची माहिती दिली. हा उपक्रम समाजापर्यंत पोहोचावा व समाजातून 

प्लॅस्टिक हद्दपार व्हावे याकरिता जनजागृतीची फलके व कापडी पिशव्या हाती घेऊन विद्यार्थ्यांनी भाजी बाजारातून रॅली काढली. विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री.विश्वनाथ गद्रे,कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव,ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य, सर्व शाळा समिती सदस्य, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर, प्राथामिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे व शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.