बाल शिवाजीच्या विद्यार्थ्यांनी घेतले स्वयं शासनाचे धडे
स्थानिक बाल शिवाजी शाळेत शिक्षकदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सावरकर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला ब्राह्मण सभा सचिव श्री. मोहन गद्रे , सहसचिव सौ. वैशाली देशपांडे, संस्थेचे सदस्य श्री नरेंद्र देशपांडे ,बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे, शाळेतील सर्व शिक्षिका, पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्ग १० वी ची विद्यार्थिनी रुजुता घोगरे ही होती. ईश्वरी म्हैसने हिने अध्यक्षांचे स्वागत केले. श्रेया नाकट हिने डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्रावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. प्रज्वल आसोलकर ने ‘ Teacher for all seasons ‘ ही संकलित इंग्रजी कविता सादर केली. शिक्षकाचे आपल्या जीवनातील महत्व या विषयी आचल ठाकूर व वैभवी जैन यांनी आपले विचार इंग्रजी भाषणातून व्यक्त केले. नंदिनी कुळकर्णी हिने शिक्षकांसाठी कृतज्ञता व्यक्त करणारी ‘गुरु ‘ ही स्वरचित कविता सादर केली. अध्यक्षांचा परिचय प्रणव तारापूरे याने करून दिला. अध्यक्षीय भाषणात रुजुता घोगरे हिने तिच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे असे विचार मांडले. आभार प्रदर्शन युवराज गोदे याने केले. कार्यक्रमाचे संचालन राघवेंद्र देशमुख याने केले. संस्थेच्या सहसचिव सौ. वैशाली देशपांडे यांनी शाळेतील सर्व शिक्षिकांच्या कार्याचा गौरव करून शिक्षक दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचा समारोप गार्गी गाडगीळ हिने ‘ गुरुने दिला ज्ञानरूपी वसा ‘ या गीताने केला. तिला साईराम साखरकर याने तबल्यावर उत्तम साथ दिली.
ब्राह्मण सभा सचिव श्री. मोहन गद्रे , सहसचिव सौ. वैशाली देशपांडे, संस्थेचे सदस्य श्री नरेंद्र देशपांडे यांच्या हस्ते सर्व शिक्षिकांना शिक्षक दिनानिमित्त भेट स्वरूपात पुस्तके प्रदान करण्यात आली. यावर्षी शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांची संस्थेंतर्फे मोफत आरोग्य विषयक तपासणी करण्यात आली. वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांनी स्वयं शासनाद्वारे नर्सरी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांना अध्यापन करून शाळेचा कार्यभार उत्कृष्ट पणे सांभाळला. कु. आर्या कराळे हिने मुख्याध्यापकपदाची एक दिवशीय जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली. संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, कार्यकारिणी सदस्य सौ. अनघा देव यांनी शिक्षिकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सर्व शिक्षिकांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे याप्रसंगी कौतुक केले.