बाल शिवाजीच्या विद्यार्थ्यांनी घेतले स्वयं शासनाचे धडे
स्थानिक बाल शिवाजी शाळेत शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावरकर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य श्री नरेंद्र देशपांडे, शाळा समिती सदस्य डॉ. जयंत म्हैसने, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे, शाळेतील सर्व शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्ग १० वी ची विद्यार्थिनी कु. कांचन राजेश कवडे ही होती. याप्रसंगी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांना स्वतः तयार केलेले शुभेच्छापत्र व गुलाब पुष्प देऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. कु. संस्कृती संजय धोत्रे हिने आचार्य विनोबा भावे यांचे शैक्षणिक विचार आपल्या भाषणातून व्यक्त केले. स्वानंद मिलिंद साधू यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आपल्या इंग्रजी भाषणातून प्रकाश टाकला. कु. गौरी विजय कुलकर्णीने शिक्षकांसाठी कृतज्ञता व्यक्त करणारी स्वरचित कविता सादर केली. त्यानंतर ‘ गुरुने दिला ज्ञानरूपी वसा ‘ हे समूहगीत विद्यार्थ्यांनी सादर केले. ‘अलौकिक कार्य करण्याची प्रेरणा शिक्षकांकडूनच मिळते ‘ अशा शब्दात कांचन कवडे हिने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन जानवी शिवरकर हिने केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य श्री नरेंद्र देशपांडे यांच्या हस्ते सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त स्वरूपात पुस्तके प्रदान करण्यात आली. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी स्वयंशासन उपक्रमाची सुद्धा आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्साहाने सहभागी होऊन शाळेचे एक दिवसाचे कार्य शिस्तीत पूर्ण केले. कु. भक्ती मनीष मेन हिने मुख्याध्यापकपदाची जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली. सर्व शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे याप्रसंगी कौतुक केले.