बाल शिवाजीची मानसी राऊत विज्ञान मेळाव्यात राज्यस्तरावर

राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर,शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती,शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग अकोला यांनी आयोजित केलेल्या अमरावती विभागीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०१७मध्ये बाल शिवाजी माध्यमिक शाळेची कु.मानसी अरुण राऊत हिने विभागीयस्तरावर अव्वल येत राज्यस्तरावरील फेरीकरिता आपले स्थान निश्चित केले आहे.

प्राथमिक फेरीत तालुका स्तरावर व नंतर जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावित मानसीने विभागीय स्तरावर देखील उत्कृष्टपणे सादरीकरण करून प्रथम क्रमांक मिळवला व राज्यस्तरावरील आपले स्थान निश्चित केले आहे.या वर्षीचा विज्ञान मेळाव्याचा विषय होता “स्वच्छता अभियान-विज्ञान व तंत्रज्ञानाची भूमिका व आव्हाने”. या विषयावर मानसी राऊत हिने सखोल अभ्यासपूर्वक, विज्ञान व तंत्रज्ञानातील स्वच्छता अभियानातील आपली भूमिका विशद केली.

विविध उपकरणांचा वापर योग्य रितीने केल्यास आपण किती प्रचंड प्रमाणात स्वच्छता राखू शकतो. तसेच शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकरिता स्वच्छतेचे महत्त्व सर्वानी जाणून कृतीशील राहावे.भारताचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांनी पाहिलेले स्वच्छ भारताचे स्वप्न २०१९ पर्यंत पूर्ण करण्याकरिता प्रत्येक नागरिकाची भूमिका किती महत्वाची आहे.तसेच या सर्वांचे नियोजन करताना विंज्ञानाची भूमिका व त्यापुढील आव्हाने मानसीने उत्कृष्टपणे आपल्या Power Power Point Presentation द्वारे सादर केली.

दि. २२/९/२०१७ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्याकरिता मानसी सावंतवाडी,जिल्हा सिंधुदुर्ग येथे रवाना झाली आहे.संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव, मुख्याध्यापिका सौ. शोभा अग्रवाल,सौ कीर्ती चोपडे, कार्यकारिणी सदस्या अनघा देव व सर्व शिक्षिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.