सामूहिक अथर्वशीर्षाचे पंचसहस्रावर्तन..
श्री गणेश चतुर्थीपासून दहा दिवस या गणेश पूजेचे सामर्थ्य खरोखरच अपूर्व आहे. अशा मन व बुद्धीला शांत ठेवणाऱ्या अथर्वशीर्षाचे पठण भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. गणेश उत्सवाचे औचित्य साधून ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी शाळेत मनाला प्रसन्न करणारे अथर्वशीर्षाचे पंचसहस्रावर्तन करण्यात आले. सर्वप्रथम संस्थेचे सचिव मा.श्री. गद्रे सर, शाळा समिती सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी गणेश पूजन केले. श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे. ओम गणेश शक्ती ही सदासर्वदा पुण्यकारक आहे. तसेच सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून व आदर्श विद्यार्थी होण्याचा संकल्प करून अथर्वशीर्षाच्या पंचसहस्रावर्तनाला सुरुवात झाली. तत्पूर्वी सौ. अपर्णा बोरखडे यांनी गणपती अथर्वशीर्षाचे महत्त्व व त्या दृष्टीने गणेश चतुर्थीच्या नऊ दिवसात शुभ संकल्प केल्यास त्याचे फळ नक्कीच मिळते असे सांगितले. आवर्तनाच्या उद्घोषाने संपूर्ण परिसर पवित्र व प्रसन्न झाला. अथर्वशीर्षाच्या पठणानंतर श्री. गणेशाची आरती करण्यात आली व प्रसाद वाटप करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया ‘ या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. श्री. मोहन गद्रे सर, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे तसेच शिक्षक वृंद व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण केले.