बाल शिवाजी शाळेत  78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात!

ब्राह्मण सभा शिक्षण संकुलांतर्गत बाल शिवाजी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला. माध्यमिक शालांत 2023 परीक्षेत शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त करणारी अदिती ज्ञानेश्वर तराळे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यदिनी संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव सर यांनी ‘विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही सहजतेने कुठलीही गोष्ट मिळत नाही, खरंच आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सध्या आयुष्यासाठी घातक असलेल्या मोबाईलचा अतिरेक वापर विद्यार्थ्यांनी टाळावा’ असा मोलाचा संदेश देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर रचित ‘जयोस्तुते……’हे समूहगीत सादर केले. 1857 च्या उठावातील थोर क्रांतिकारक, ब्रिटिश सरकारला हादरून टाकणारे तात्या टोपे यांच्या बद्दल अधिराज मंगेश मुरमकार यांनी माहिती सांगितली. भारत मातेला पारतंत्र्याच्या शृंखलेतून मुक्त करताना वीर पुत्रांनी बलिदान दिले, त्याबद्दल सायली कुलकर्णी व दिव्या चांडक यांनी वीर गाथा मांडली. त्यानंतर वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी ‘उभा पाठीशी……’हे समूहगीत सादर केले. त्यानंतर राज्यस्तरावर विविध परीक्षांमध्ये गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या भाषणात अदिती तराळे हिने शाळेप्रती आपल्या मनोगतात शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला ब्राह्मण सभा सदस्या शुभांगी वझे, शाळा समिती सदस्य श्री महेश कोतेगावकर,कल्याणी बेलोरकार तसेच पालक वर्ग उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता जळमकर व कीर्ती चोपडे आणि शाळेच्या शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने झाली.