बाल शिवाजी शाळेत स्व. अण्णासाहेब देव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे यशस्वी आयोजन
स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत संस्थेचेसंस्थापक स्व. अण्णासाहेब देव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘ भारत- काल, आज आणि उद्या ‘ हा विषय होता. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. गजानन मालोकार व सौ. अश्विनी गोरे यांनी केले. सर्वप्रथम शाळेचे संस्थापक स्व. अण्णासाहेब देव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री.विश्वनाथ गद्रे यांनी केले. शहरातील १२ शाळेतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत बाल शिवाजी प्राथमिक शाळेचा विद्यार्थी आयुष गजानन जळमकर हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. कोठारी कॉन्व्हेंट या शाळेची विद्यार्थिनी स्वरा आशिष गुल्हाने हिने व्दितीय क्रमांक पटकावला. तसेच माउंट कारमेल ची अक्षिता अशोक हातकर या विद्यार्थिनीने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले. स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
तसेच शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी वर्ग ५ चे आर्यन राजकुमार चांदुरकर, अन्वी अतुल बराटे ,स्वर्णाभ गुंजन लांडगे ,वर्ग ६ चे ईश्वरी किशोर तायडे, गिरीजा उमेश सपकाळ, प्रणव सतीश नवले वर्ग ७ चे अभिनव निलेश सोनी, रेणुका हरीश गोगरकर, आयुष गजानन जळमकर यांना पुस्तक भेट देऊन त्यांचे याप्रसंगी कौतुक करण्यात आले. ‘ तुमच्या अंगी असणारे गुण, कौशल्य यापेक्षाही त्यांचे सादरीकरण अधिक महत्त्वपूर्ण ठरते, कारण सौंदर्य हे रचनेत असते ‘ असे विचार मा. डॉ. गजानन मालोकार यांनी याप्रसंगी व्यक्त केले आणि सर्व सहभागी विद्यार्थांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. ‘ थोर व्यक्तींनी केलेल्या लेखनाचे नियमित वाचन केल्याने आपले वक्तृत्व नक्कीच विकसित होईल ‘. असे विचार सौ.अश्विनी गोरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सौ. संगिता भारंबे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने करण्यात आली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अविनाश देव, कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे व शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.