बाल शिवाजी शाळेत ‘आंतरशालेय वादविवाद स्पर्धा ‘ संपन्न

स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत नुकतीच आंतरशालेय वादविवाद स्पर्धा संपन्न झाली.बाल शिवाजी शाळेचे संस्थापक कै.अण्णासाहेब देव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचा विषय होता.’व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया केवळ बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे करणे योग्य आहे / नाही ‘. या स्पर्धेला परीक्षक म्हणून होरायझन कॉम्प्युटर च्या संचालिका सौ. मोहिनी मोडक आणि स्व. ज्योती जानोरकर कनिष्ठ महाविद्यालय अकोला येथील प्राध्यापक पी.बी.चौधरी लाभले होते.अकोल्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.

सर्वप्रथम शाळेचे संस्थापक कै.अण्णासाहेब देव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे सचिव मोहन गद्रे यांनी केले.तदनंतर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.स्पर्धेत स्पर्धकांनी विषयाच्या बाजूने आणि विषयाच्या विरुद्ध बाजूने आपली मते मांडली.
या स्पर्धेत बाल शिवाजी शाळेच्या मानसी अरुण राऊत आणि वैष्णवी अनिलकुमार सुरडकर यांच्या चमूने प्रथम क्रमांकाचे रोख पारितोषिक पटकावले तर शाळेला स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.तर द्वितीय रोख पारितोषिक कोठारी कॉन्व्हेंट च्या गोविंद प्रदीप बनारसे व संस्कृती राजू जाधव आणि तृतीय क्रमांकाचे रोख पारितोषिक हिंदू ज्ञानपीठ शाळेच्या संस्कृती चंदू लालबोन्द्रे व श्रुती कैलास घावट या चमूने मिळवले. ज्युबिली इंग्लिश स्कूलची दर्शना नरहरी दांदळे व प.पू.हेडगेवार माध्यमिक शाळेचा ऋषिकेश विष्णू इंगळे यांना उत्कृष्ट वक्ता म्हणून रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

यानंतर कै.अण्णासाहेब देव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वर्गवार घेतलेल्या वादविवाद स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यामध्ये मानसी राजेश डाबरे, तनुश्री गिरीश खर्चे , गौरी विहार गाडगीळ , शिवानी रवींद्र पोटे , मानसी अरुण राऊत , वैष्णवी अनिल सुरडकर , या विद्यार्थिनीचा समावेश आहे.

या स्पर्धेला शाळेचे सचिव मोहन गद्रे ,शाळा समिती सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका,वरिष्ठ वर्ग ,शिक्षिका,पालकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ. स्वाती बापट यांनी केले. कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने करण्यात आली.